Sat, Dec 07, 2019 13:59होमपेज › Mumbai-Thane-Raigad › विवाह नोंदणी साईटवरून ठाण्याच्या २८ महिलांची फसवणूक

विवाह नोंदणी साईटवरून ठाण्याच्या २८ महिलांची फसवणूक

Published On: Jan 01 2018 2:01AM | Last Updated: Jan 01 2018 1:18AM

बुकमार्क करा
ठाणे : प्रतिनिधी

मॅट्रिमोनियल साईटच्या माध्यमातून लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक होण्याच्या घटना अलीकडे प्रचंड प्रमाणात वाढल्या आहेत. मॅट्रिमोनियल साईटच्या माध्यमातून फसवणूक होणार्‍या प्रकरणांची संख्या शोधून काढली असता ठाणे जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात मागील दोन वर्षांत तब्बल 102 विवाहेच्छुक महिला व पुरुषांची फसवणूक झाल्याची नोंद पोलीस दप्तरी आढळून आली. तर या वर्षी जानेवारी ते ऑक्टोबर 2017 या कालावधीत सर्वाधिक म्हणजे 28 महिलांची  फसवणूक झाल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

विवाह जुळवणार्‍या मॅट्रोमोनियल वेबसाईटवर फेक प्रोफाईल बनवून त्या माध्यमातून महिलांना फसवण्याचे प्रकार अलीकडे मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. ठाणे पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात गेल्या दहा महिन्यांत तब्बल 28 विवाहेच्छुक महिलांना या साईटच्या माध्यमातून भामट्यांनी लग्नाचे आमिष दाखवून गंडवले आहे. तर फेक प्रोफाईल बनवून महिलांची आर्थिक फसवणूक करणार्‍या 4 नायजेरियन नागरिकांना पोलिसांनी गजाआड केले आहेत. दिल्ली आणि नोएडा या भागात टुरिझम कंपनी उघडण्याच्या नावाने भाड्याने घेतलेल्या कार्यालयात बसून नायजेरियन नागरिक अशा प्रकारची फसवणूक करत असल्याचे पोलीस तपासातून समोर आले आहे. एखाद्या एनआरआय व्यक्तीच्या नावाने फेक प्रोफाईल रजिस्टर करून ही मंडळी विवाहेच्छुक महिलांशी ओळख वाढवतात. 

त्यानंतर विदेशातून भारतात भेटण्यास येण्याचा अथवा महागडे गिफ्ट पाठवण्याचा बहाणा करतात. त्यानंतर महिलांना एक फोन येतो की, तुमच्या नावाने महागडे गिफ्ट आले असून ते हवे असेल तर तुम्हला काही हजार रुपये आमच्या खात्यात भरावे लागतील. एकदा का खात्यात पैसे भरले की सारे फोन क्रमांक बंद येतात. या फसवणुकीच्या घटनांना प्रतिबंध व्हावा म्हणून महिला आणि बाल विकास मंत्रालयाकडून मॅट्रिमोनियल साईट्स अर्थात लग्न जुळवणार्‍या वेबसाईट्सवर कडक बंधने घालण्यात आली आहेत. मात्र, या साईट्स ती सर्व बंधने व नियम धाब्यावर बसवतात आणि आपले अधिकाधिक युजर्स कसे वाढतील यासाठी प्रयत्न करतात आणि येथेच काही भामट्या लोकांचे फोफावते. 

भामट्यांनी महिलेला 10 लाखांना लुबाडले

आधीच चार लग्न झालेले असताना जीवनसाथी डॉट कॉम या विवाह जुळवणार्‍या वेबसाईट वरून ठाण्यातील दोघा महिलांशी संपर्क साधून त्यांच्याशी लग्न करणार्‍या भामट्याविरोधात नुकताच चितळसर-मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या भामट्याने दोघांपैकी एका महिलेकडून 10 लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याचे देखील समोर आले आहे. 

याच घटनेच्या पार्श्‍वभूमीवर मॅट्रिमोनियल साईटच्या माध्यमातून फसवणूक होणार्‍या प्रकरणांची संख्या शोधून काढली असता ठाणे जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात मागील दोन वर्षांत तब्बल 102 विवाहेच्छुक महिला व पुरुषांची फसवणूक झाल्याची नोंद पोलीस दप्तरी करण्यात आली आहे.