होमपेज › Mumbai-Thane-Raigad › जलयुक्त शिवारसाठी 'सिद्धीविनायक'तर्फे १ कोटी

जलयुक्त शिवारसाठी 'सिद्धीविनायक'तर्फे १ कोटी

Published On: Dec 16 2017 3:36PM | Last Updated: Dec 16 2017 3:36PM

बुकमार्क करा

नवी मुंबई:प्रतिनिधी 

श्री सिद्धीविनायक गणपती मंदिर प्रभादेवी न्यासातर्फे ठाणे जिल्ह्यातील जलयुक्त शिवार अभियानासाठी १ कोटी रुपयांचा धनादेश आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा धनादेश प्रदान केला.

जलयुक्त शिवारसाठी जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांत चांगले काम झाले असून या माध्यमातून जिल्ह्यातील शेतीला उभारी देण्याचे तसेच पाणी टंचाई मिटवण्याचे आमचे प्रयत्न आहेत आणि श्री सिद्धीविनायक सारख्या आणखीही काही संस्थांनी यात आपले योगदान देऊन सामाजिक बांधिलकी दाखवावी असे आवाहन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

जलयुक्त शिवारसाठी जिल्ह्यात ४४ गावे निवडण्यात आली असून सुमारे ४० कोटींचा आराखडा आहे. सिद्धीविनायक तर्फे देण्यात आलेली मदत महत्वाची असून दोन वर्षांपूर्वी देखील न्यासाने या कामासाठी आपले योगदान दिले होते त्याबध्दल जिल्हाधिकाऱ्यांनी आभार मानले.

७४ कोटी ५० लाख रुपये देणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आवाहनास तत्काळ प्रतिसाद म्हणून श्री सिद्धीविनायक न्यासाने तीन टप्प्यात अनुक्रमे १ कोटी, १९ लाख ११ हजार, आणि १ कोटी असे राज्यातील ३४ जिल्ह्यांना ७४ कोटी ५० लाख रुपयांचे अर्थसहाय्य करावयाचे ठरविले आहे असे आदेश बांदेकर यांनी यावेळी सांगितले.

आज या धनादेश प्रदानप्रसंगी कोषाध्यक्ष सुमंत घैसास, विश्वस्त विशाखा राऊत, आनंद राव, महेश मुदलियार, वैभवी चव्हाण, कार्यकारी अधिकारी सुबोध आचार्य, ,संजीव पाटील, उप कार्यकारी अधिकारी रवी जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी वंदना सूर्यवंशी उपस्थित होते