Fri, Apr 26, 2019 03:26होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मैत्री; एका शिट्टीवर जमा होतात शेकडो कावळे

मैत्री; एका शिट्टीवर जमा होतात शेकडो कावळे

Published On: May 12 2018 1:10PM | Last Updated: May 12 2018 1:10PMमुलुंड : प्रशांत बढे

मुलुंडमधील 70 वर्षीय त्रिकमजी देवजी ठक्कर उर्फ कावळेवाले काका हे मुलुंडमध्ये सध्या अतिशय आश्‍चर्याचा विषय झाले आहेत. हातात फरसाण अथवा दही, दूध- भात घेऊन जेव्हा ते घराबाहेर पडतात आणि शिट्टी मारतात, तेव्हा शेकडो कावळे त्यांच्या हातावर, मानेवर एवढेच नाही तर, डोक्यावर सुद्धा बसतात.

मुलुंडमधील योगी हिल परिसरातील सनराईस इमारतीमधील त्रिकमजी ठक्कर हे ब्रोकर म्हणून काम करतात. घरी पत्नी, एक मुलगा आणि तीन मुली असा त्यांचा परिवार. वयाच्या दहाव्या वर्षांपासून परिसरातील कुत्र्यांना खायला घालणे हा त्यांचा छंद. एकेदिवशी सकाळी नेहमीप्रमाणे त्यांनी हातात कुत्र्यांसाठी खाणे आणले आणि शिट्टी मारून कुत्र्यांना गोळा केले. हे पाहून त्यांच्याच विभागातील एका व्यक्तीने त्यांना शिट्टी मारून कावळ्यांना बोलावू शकतो का? आपण दहा हजराची पैज लावू, असे आव्हान केले. 

यावर दहा ते पंधरा दिवस ठक्कर यांनी हातात खाण्याचे साहित्य घेऊन कावळ्यांना शिट्टी मारून बोलावण्यास सुरुवात केली. काही दिवसांतच त्यांना यश आले. एक दोन नव्हे, तर शेकडो कावळे त्यांच्या अंगाखांद्यावर येऊन बसू लागले. मागील पंचेचाळीस वर्षांपासून या कावळ्यांची आणि ठक्कर यांची मैत्री दृढ झाली आहे. 

रोज सकाळी उठणे, कावळ्यांसाठी भात किंवा इतर खाण्याची वस्तू तयार करणे आणि सुमारे एक तास दहा ते बारा ठिकाणी फिरून कावळ्यांना शिट्टी मारून बोलावणे, त्यांना प्रेमाने खायला घालणे आणि त्यानंतर आपल्या इतर कामास सुरुवात करणे असा त्यांचा दिनक्रम आहे. 

माणसाला काक स्पर्श होणे हे अशुभ समजले जाते. काक स्पर्श झाल्यास मृत्यू ओढवतो असा गैरसमज सामाजात आहे. परंतु ठक्कर यांचे विचार वेगळे आहे. हिंदू धर्माप्रमाणे कावळे हे आपले पित्र आहेत. मग त्यांना एकाच दिवशी खाणे घालून कसे भागणार. त्यांना रोजच जेवायला देऊन आपण आपले कर्तव्य पार पाडत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. कावळ्यांशी मैत्री झाल्यापासून आपली प्रगतीच होत गेल्याचे त्यांनी सांगितले. कावळे, कुत्रे आणि इतर प्राण्यासाठी ठक्कर यांनी विविध इमारतींखाली सिमेंटच्या पाण्याचे हौद देखील तयार केले आहेत. 

इतर सर्व प्राणी-पक्षांवर माणसे प्रेम करतात. परंतु कावळ्यांवर कोणी प्रेम करीत नाही. कावळा सर्वात चाणाक्ष पक्षी आहे. हिंदू धर्माप्रमाणे ते आपले पितृ आहेत. त्यांच्या सानिध्यात समाधान मिळते. त्यामुळे मला कावळेवाला काका अशी ओळख मिळाली. दीड हजारांपेक्षा जास्त कावळे माझ्या शिट्टीच्या आवाजाने गोळा होतात. - त्रिकमजी ठक्कर