आज मुंबईत ‘ठाकरे विरुद्ध ठाकरे’!

Last Updated: Jan 23 2020 1:57AM
Responsive image


मुंबई : पुढारी वृत्तसेवा

गुरुवारी 23 जानेवारीच्या मुहूर्तावर मुंबईत ठाकरे विरुद्ध ठाकरे असा लक्षवेधी आणि प्रचंड गर्दी खेचणारा  शो  होऊ घातला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचा हा मुहूर्त साधत शिवसेनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा   भव्य सत्कार आयोजित करीत गुरुवारी सायंकाळी 5 वाजता बीकेसीच्या एमएमआरडीए मैदानावर मोठा जल्‍लोष करण्याचा घाट घातला आहे. सेनेचा मुख्यमंत्री करण्याचे वचन शिवसेनाप्रमुखांना दिले ते पूर्ण केल्याबद्दल राज्यभरातील शिवसेनेच्यावतीने हा सत्कार होईल.  त्यानिमित्ताने होणार्‍या जल्‍लोषात शंकर महादेवन, अजय-अतुल आदी गायक, संगीतकारांपासून ते भाऊ कदम, निलेश साबळे, भारत गणेशपुरे, कुशल बद्रिके, श्रेया बुगडे आदी विनोदवीरही सहभागी होत आहेत. प्रचंड गर्दी खेचणार्‍या करमणुकीच्या कार्यक्रमातच 11 ज्येष्ठ शिवसैनिक उद्धव ठाकरे यांना सन्मानित करतील. 

सायंकाळी सेनेचा हा जल्‍लोष तर त्याआधीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे सकाळी 9 वाजता गोरेगावच्या नेस्को मैदानावर मनसेचा नवा झेंडा फडकवत महाअधिवेशनाचे उद्घाटन करतील. मनसेच्या नव्या झेंड्याचा रंग फक्‍त भगवा असेल. उर्वरित निळा आणि हिरवा रंग वगळण्यात आला आहे. मनसे प्रथमच हिंदुत्वाची भूमिका घेणार असल्याचे स्पष्ट संकेत आहेत. 

‘सत्तेसाठी सतराशे साठ मात्र महाराष्ट्र धर्मासाठी एकच सम—ाट’ या मजकुराचे बॅनर्स मनसेकडून लावण्यात आले होते. हिंदुत्वाच्या भूमिकेकडे आगेकूच करतानाच महाराष्ट्र धर्माचा विसर पडणार नाही असे मनसेने याद्वारे सूचित केले आहे. मनसेकडून अधिवेशनाचे दोन व्हिडिओ रिलीज केले आहेत. यात छत्रपती शिवाजी महाराज हे केंद्रस्थानी आहेत. रयतेचे राज्य आणण्यासाठी प्रत्येक जाती- धर्माचा माणूस लढत होता असे सांगत शिवाजी महाराज हे सर्वांचे आदर्श होते असे भाष्य या व्हिडिओत करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या व्हिडीओला खुद्द राज ठाकरेंनी ‘व्हॉईस ओव्हर’ दिला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी या धर्मनिरपेक्ष विचारांच्या पक्षांसोबत सरकार स्थापन केल्याने हिंदुत्ववादी विचारापासून शिवसेना दूर जात असल्याचे चित्र आहे. मनसेने ही संधी हेरत हिंदुत्ववादी विचारधारा आपलीशी करण्याचा प्रयत्न सुरू केल्याचे मानले जाते.