Thu, Aug 22, 2019 04:46होमपेज › Mumbai-Thane-Raigad › केबलवॉरमध्ये ठाकरे !

केबलवॉरमध्ये ठाकरे !

Published On: Aug 26 2018 1:45AM | Last Updated: Aug 26 2018 1:28AMमुंबई : प्रतिनिधी 

इंटरनेटसोबत केबलही फुकट देण्याच्या घोषणा होत आहेत. यातून प्रेरणा घेऊन जसे केबल, इंटरनेट फुकट देतायत, तसे रेशन आणि पेट्रोल-डिझेल, दूध, भाजीपालाही फुकट द्या, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारला लगावला. जिओ केबलमुळे या क्षेत्रातील व्यावसायिकांच्या पोटावर शिवसेना पाय येऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे. 

जिओ फायबरमुळे केबल व इंटरनेट क्षेत्रातील व्यावसायिकांवर मोठा परिणाम होणार असून या क्षेत्रातील रोजगार हिरावला जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्यातील केबल मालक-चालकांचा मेळावा शनिवारी मुंबईत रंगशारदा सभागृहात उद्धव यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी शिवसेना आमदार अ‍ॅड. अनिल परब उपस्थित होते. 

वाजपेयी सरकारच्या काळात सेट टॉप बॉक्स बसविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे केबल चालकांच्या मागे ठामपणे उभे राहिले, कोणत्याही परिस्थितीत केबल व्यवसायातील तरुणांचा रोजगार हिरावला जाणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. आताही भाजपाचे सरकार आहे. डिजिटल इंडिया करून लोकांची पोटं भरणार नाहीत. केवळ फोनवर दाखवण्यासाठी नव्हे तर लोकांच्या ताटातसुद्धा असायला हवे, असे सांगत उद्धव यांनी जिओ फायबरमुळे केबल व्यवसायातील रोजगार हिरावला जाऊ नये, अशी शिवसेनेची भूमिका असल्याचे स्पष्ट केले.

जिओमुळे केबलचालकांना अस्वस्थ वाटणे सहाजिक आहे. केबलचालकांनी पंचवीस-तीस वर्षे कष्ट करून बसवलेला व्यवसाय एखाद्या घोषणेमुळे एकदम बंद होत असेल तर शिवसेना तसे होऊ देणार नाही. या क्षेत्रातील व्यावसायिकांशी चर्चा करून त्यांच्या अटींवर विचार करून केबल व इंटरनेट सेवेसंदर्भातील धोरण ठरविण्यात यावे, अशी सूचना त्यांनी केली. 

उद्योगधंदा करू नये, असे आम्ही कुठेही म्हणत नाही. आणखी दहा जणांनी उद्योगात उतरावे, त्याला कुणाचा विरोध नाही. पण ही जी लोक घराघरात गेलेली आहेत. त्यांची घरेदारे उद्धवस्त करू नका, असे ते म्हणाले.

जिओचे मनसेला ठोस आश्‍वासन

मुंबई : प्रतिनिधी

जिओ कंपनीने केबल व इंटरनेट क्षेत्रातील व्यवसायात पदार्पण केल्यामुळे महाराष्ट्रातील केबलनेट व्यावसायिकांत असुरक्षिततेचे वातावरण तयार झाले आहे. केबल व्यावसायिकांनी राज यांची भेट घेऊन कैफियत मांडली होती. या क्षेत्रात व्यवसाय करणार्‍यांना सोबत घेऊन पुढील वाटचाल करावी, असे आवाहन मनसेने केले होते. त्यास सकारात्मक प्रतिसाद देत जिओ कंपनीने केबल व्यावसायिकांना भागीदार म्हणून सोबत घेण्यात येईल, असे आश्‍वासन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पत्र पाठवून दिले आहे. 

केबल, इंटरनेटच्या व्यवसायावर महाराष्ट्रातील अनेकांचा चरितार्थ अवलंबून आहे. हा व्यवसाय तसेच या क्षेत्रात काम करणारा कर्मचारीवर्ग संकटात येईल, असे कोणतेही चुकीचे धोरण जिओ कंपनीने राबवू नये, असा इशारा मनसेने जिओ कंपनीला दिला होता. जिओ कंपनीच्या गिगा फायबर सेवेबाबत कंपनीने राज ठाकरे यांना पत्र पाठवून जिओच्या व्यवसायाबाबतची भूमिका स्पष्ट केली आहे. 

जिओ भारतातील दूरसंचार आणि डिजिटल सेवा क्षेत्रात परिवर्तन घडवून आणत आहे. उच्चतम गुणवत्तेची जलदगती इंटरनेट सेवा अतिशय माफक दरात देण्यात येणार आहे. भागीदारांसह सर्वसमावेशक आणि सर्वांगिण विकास हे जिओचे धोरण असेल. या धोरणानुसार केबल व्यावसायातील मालक व चालक यांना भागीदार म्हणून सोबत घेऊन कंपनी पुढील वाटचाल करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.