होमपेज › Mumbai-Thane-Raigad › जानेवारीमध्ये टेक्स्टाईल म्युझियमचा नारळ वाढणार!

जानेवारीमध्ये टेक्स्टाईल म्युझियमचा नारळ वाढणार!

Published On: Dec 17 2017 3:04AM | Last Updated: Dec 17 2017 2:20AM

बुकमार्क करा

मुंबई : राजेश सावंत

काळाचौकी येथील इंडिया युनायटेड मिल क्रमांक 2 व 3 येथे टेक्स्टाईल म्युझियम उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दोन टप्प्यात विकसित करण्यात येणार्‍या या म्युझियमच्या पहिल्या टप्प्याच्या निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहेत. त्यामुळे जानेवारी 2018 मध्ये या म्युझियमच्या कामाचा नारळ फुटणार असल्याचा विश्वास मुंबई महापालिकेने व्यक्त केला. 

राज्य शासनाने इंडिया युनाटेड मिल क्रमांक 2 व 3 च्या एकूण 61 हजार 56 .89 चौरस मीटर क्षेत्रफळापैकी 44 हजार चौरस मीटर क्षेत्रफळ मनोरंजन मैदान व टेक्स्टाईल म्युझियमसाठी राखीव ठेवला आहे. यापैकी 20 टक्के क्षेत्राचा पहिल्या टप्प्यात विकास करण्यात येणार आहे. मिलच्या आवारात सुमारे 2 हजार 368 चौरस मीटर तलाव आहे. या तलावातील पाणी मिलमध्ये पूर्वी वापरण्यात येत होते. सध्या हा तलाव वापरात नसल्यामुळे तो गाळाने भरून गेला आहे. पहिल्या टप्प्यात हा गाळ काढून तलाव विकसित करण्यात येणार आहे. तलावाच्या काठावर पर्यटकांना बसता यावे, यासाठी नदीकाठावरील घाटाप्रमाणे पायर्‍या बनवण्यात येणार आहेत. तलावाच्या वरील बाजूस मोठे उद्यान साकारण्यात येणार असून परिसरात खाद्यपदार्थांचे संकुल, शौचालय व अन्य सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. 

तलावाची मज्जा घेण्यासाठी तलावात दूरपर्यंत दोन प्लॅटफॉर्म उभारले जाणार आहेत. त्याशिवाय संरक्षक भिंत व तलाव परिसराला हेरिटेज लूक येण्यासाठी दगडी लादीकरण करण्यात येणार आहे. यासाठी 6 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आल्याचे पालिकेच्या पुरातन विभागाच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले. या कामाच्या निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून जानेवारी 2018 मध्ये या म्युझियमच्या कामाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. या कामासाठी सात ते आठ महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे डिसेंबर 2018 पर्यंत हा तलाव आम जनतेसाठी खुला होईल, असा विश्वास पालिकेने व्यक्त केला.