Thu, Aug 22, 2019 08:51होमपेज › Mumbai-Thane-Raigad › देवाडीवालाचा खास हस्तक गजाआड

देवाडीवालाचा खास हस्तक गजाआड

Published On: May 17 2018 2:21AM | Last Updated: May 17 2018 2:03AMमुंबई : प्रतिनिधी

आत्मघातकी हल्ल्याचे प्रशिक्षण घेऊन मुंबईत परतलेल्या दहशतवादी फैझल मिर्झा (32) याच्या अटकेनंतर राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) हे संपूर्ण रॅकेट उद्ध्वस्त करण्यास सुरुवात केली आहे. अल्लारखा अबुबकर मन्सुरी (32) असे या आरोपीचे नाव असून तो दुबई पोलिसांनी अटक केलेल्या फारुख देवाडीवाला याचा खास हस्तक होता. महत्त्वाचे म्हणजे, देशातील महत्त्वांच्या महानगरांमध्ये हल्ल्याची योजना पूर्ण झाल्यानंतर लागणारी शस्त्रे आणि दारूगोळा पोच करण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपविण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

कुख्यात मोस्ट वॉन्टेड डॉन दाऊद इब्राहीमचा खास हस्तक छोटा शकीलचा साथीदार असलेला देवाडीवाला हा डी गँगच्या गुजरातमधील कारवाया सांभाळत होता. गुप्तचर यंत्रणांनी दाऊद विरोधात फास आवळ्यास सुरुवात करताच तो दुबईमध्ये पळाला. तेथे एक व्यावसायिक म्हणून काम करत डी गँगचा गुजरातमधील कारभार पाहत होता. आयएसआयच्या सांगण्यावरूनच देवाडीवालाने मिर्झा याच्यासह देशातील काही तरुणांची माथी भडकवून त्यांना दहशतवादी हल्ल्यासाठी तयार केले असल्याची धक्कादायक माहिती एटीएसच्या हाती लागली असून त्याआधारे एटीएसने काही संशयित तरुणांची धरपकड सुरू केली आहे.

देवडीवाला याला दुबई पोलिसांनी अटक केली असून त्याला भारतात आणण्यासाठी तपास यंत्रणा प्रयत्न करत आहेत. तर, मिर्झा याच्याकडे एटीएसचे अधिकारी कसून चौकशी करत आहेत. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारेच एटीएसने गुजरातमध्ये चालक म्हणून काम करत असलेल्या मन्सुरीला अटक केली. तो मिर्झाचा नातेवाईक असल्याची माहिती समोर येत आहे. एटीएसने त्याच्याजवळून महत्त्वपूर्ण दस्तऐवज एटीएसने जप्त केले असून न्यायालयाने 25 मे पर्यंत कोठडी सुनावली आहे.