Sun, May 19, 2019 22:01होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अंधेरीतील शाळेतही दहावीचा पेपर फुटला

अंधेरीतील शाळेतही दहावीचा पेपर फुटला

Published On: Mar 21 2018 1:40AM | Last Updated: Mar 21 2018 1:34AMमुंबई : प्रतिनिधी

दहावी पेपर फुटीचे लोण थांबता थांबेना.  सोमवारी अंधेरीतील एका शाळेत इतिहास, समाजशास्त्राचा पेपर फुटला. खासगी क्‍लासेसच्या चालकाने हा प्रताप केल्याचे उघडकीस आले. रात्री उशिरा आंबोली पोलिसांत गुन्हा दाखल होताच नागपाडा आणि अंबरनाथ येथून अकराजणांना अटक केली. त्यात दहावीच्या आठ अल्पवयीन विद्यार्थ्यांसह एका खासगी क्‍लासच्या शिक्षकाचा समावेश आहे. अन्वरउल हसनश्र अजंरुल हसन शेख, इम्रान सुलेमान शेख आणि फिरोज अब्दुल माजिद खान अशी तिघांची नावे आहेत.  अंबरनाथ येथील फिरोज या  शिक्षकाने हा पेपर लिक केल्याचे पोलीस उपनिरीक्षक दया नायक यांनी सांगितले.

आठही विद्यार्थ्यांना डोंगरीतील बालसुधारगृहात पाठविण्यात आले.  तिन्ही आरोपींना मंगळवारी अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अंधेरीतील विरा देसाई मार्गावरील एमव्हीएम स्वामी मुक्तानंद हायस्कूलमध्ये दहावीची परिक्षा केेंद्र असून शाळेच्या 16  परिक्षा हॉलमध्ये विद्यार्थी पेपर देतात. सोमवारी इंग्रजी माध्यमाचा इतिहास, समाजशास्त्राचा पेपर होता. अकरा वाजता परिक्षा सुरु होणार असल्याने सर्व विद्यार्थ्यांना साडेदहा वाजता परिक्षेसाठी प्रवेश देण्यात आला होता. 

शिक्षिका संध्या विलास पवार यांना तीन विद्यार्थी मोबाईल आणि पुस्तकात काहीतरी पाहत असल्याचे दिसून आले. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी इतर शिक्षकांच्या मदतीने विद्यार्थ्यांना ताब्यात घेऊन मोबाईलची पाहणी केली. सोमवारचा इतिहास, समाजशास्त्राचा पेपर त्यांच्या मोबाईलमध्ये असल्याचे त्यांना निदर्शनास आले. आंबोली पोलिसांसह दहावी बोर्डचे कस्टोडिएल उदय भोज, विभागीय सचिव सुभाष बोरसे, बोर्डाच्या हेल्पलाईन क्रमांकावर ही माहिती दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत गायकवाड व त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली परिक्षा संपल्यानंतर  तिन्ही विद्यार्थ्यांना  चौकशीसाठी ताब्यात घेतले. हा पेपर इन्स्टाग्रामवर व्हायरल झाला होता. त्यानंतर काही विद्यार्थ्यांनी तो पेपर व्हॉट्सअ‍ॅपवर डाऊनलोड केला. याप्रकरणी रात्री उशिरा आंबोली पोलिसांनी 5, 6, 7, 8 महाराष्ट्र विद्यापीठ बोर्ड व इतर परिक्षामध्ये होणार्‍या गैरव्यवहारांना प्रति अधिनियम 1982 सहकलम 66 ड आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली होती. 

पोलीस उपायुक्त परमजीत दहिया, सहाय्यक पोलीस आयुक्त दत्तात्रय भरगुडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत गायकवाड यांच्या पथकातील रविंद्र साळुंखे, दया नायक, अभिजीत जाधव, संजय पवार, परिक्षित भाट, ज्योती पाडेकर, प्रशांत साळवी, बाळा चौहाण यांनी नागपाडा आणि अंबरनाथ येथून तीन आरोपींसह अन्य पाच विद्यार्थ्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.