भारतीय हद्दीत घुसखोरी; चीनच्या आडमुठेपणामुळे चर्चा निष्फळ

Last Updated: Jun 07 2020 9:36AM
Responsive image


नवी दिल्ली : पीटीआय/वृत्तसंस्था

भारतीय हद्दीत चार किलोमीटरपर्यंत आत घुसलेले चिनी सैन्य मागे घेण्यात यावे, अशी मागणी शनिवारी भारतीय लष्करी अधिकार्‍यांनी केली. मात्र, चीनने त्याला प्रतिसाद न देता आडमुठी भूमिका घेतली. भारताने भारतीय हद्दीतील रस्ते बांधणीचे काम थांबवावे, असा उलटा पवित्रा चिनी अधिकार्‍यांनी घेतला. त्यामुळे तणाव निवळण्यासाठी भारत-चीनची लेफ्टनंट जनरल अशा उच्च अधिकारी पातळीवर झालेली चर्चा निष्फळ ठरली. चीनच्या अडेलतट्टूपणामुळे लडाख भागातील तणाव कायम आहे.

चीनने लपवले, अन् जग कोरोना खाईत लोटले!

चीनने आपल्या देशातील कोरोनावर नियंत्रण आणतानाच सार्‍या जगाला कोरोनाच्या खाईत लोटले. कोरोना महामारीमुळे भारत अडचणीत आल्याची संधी साधून भारताचा आणखी लचका तोडण्यासाठी चीनने भारतीय हद्दीत घुसखोरीचे कारस्थान केले आहे. पूर्व लडाखमध्ये महिनाभरापासून भारत आणि चीन दरम्यान सीमेवर सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर शनिवारी दोन्ही देशांच्या वतीने लेफ्टनंट जनरल या उच्च स्तरावरील चर्चा झाली. प्रसिद्धी माध्यमांना या बैठकीपासून दूरच ठेवण्यात आल्याने चर्चेचा अधिकृत तपशील कळू शकला नाही. या बैठकीत भारताने भारतीय हद्दीत घुसलेले चिनी सैन्य मागे घ्यावे, असा मुद्दा मांडला. मात्र चीनकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही.  त्याचप्रमाणे एप्रिल 2020 मध्ये असलेली स्थिती कायम ठेवावी, अशी आग्रही भूमिका भारतीय अधिकार्‍यांनी घेतली. 

दरम्यान, भारतीय लष्कराच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चर्चा संपल्यानंतर 14 कॉर्प्सचे कमांडर लेफ्टनंट जनरल हरिंदर सिंह यांच्या नेतृत्वाखालील प्रतिनिधी मंडळ लेहला परतले आहे. हे शिष्टमंडळ लष्करप्रमुख मुकुंद नरवणे यांना अहवाल देणार आहे. त्यानंतर चर्चेचा तपशील त्यांच्याकडून पंतप्रधान कार्यालयाला कळविला जाणार आहे.

धोरण चुकले आणि चिनी आक्रमणाचे परिणाम सार्‍या देशाला भोगावे लागले!

चर्चा सुरू राहणार

अधिकृत सूत्रांच्या म्हणण्यानुसार, सीमेवरील तणाव संपविण्यासाठी दोन्ही देशांदरम्यान हा पहिला मोठा प्रयत्न होता. दोन्ही देशांमध्ये लष्कर आणि राजनैतिक पातळीवरील चर्चेची मालिका यापुढेही कायम राहील. दोन्ही देशांमधील ही चर्चा पूर्व लडाखमध्ये चीनच्या हद्दीत प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील माल्डोमध्ये झाली. याठिकाणी सीमेवरील अधिकार्‍यांची बैठक होते. भारतीय लष्कराच्या एका प्रवक्त्याने चर्चेतील तपशिलाचा उल्लेख न करता सांगितले की, भारत-चीन सीमेवरील सध्याची परिस्थिती पाहता भारत आणि चीनचे अधिकारी आधी निश्‍चित केल्याप्रमाणे लष्कर आणि राजनैतिक माध्यमातून यापुढेही भेटत राहतील.

यापूर्वीही चर्चेच्या 15 फेर्‍या

शनिवारी दोन्ही देशांच्या वतीने झालेल्या लेफ्टनंट जनरल पातळीवरील चर्चेेच्या आधी स्थानिक कमांडरांच्या पातळीवर दोन्ही लष्करांदरम्यान 12 फेर्‍यांची बैठक झाली आहे. त्याशिवाय मेजर जनरल स्तरावरही तीनवेळा चर्चा झाली आहे. सूत्रांनी सांगितले की, अनेक फेर्‍यांतून झालेल्या चर्चेत कोणताही तोडगा न निघाल्यामुळे  लेफ्टनंट जनरल अशा उच्च पातळीवर चर्चेचा निर्णय झाला. एक दिवस आधी म्हणजेच शुक्रवारी दोन्ही देशांदरम्यान झालेल्या राजनैतिक चर्चेमध्ये दोन्हीही देशांनी एकमेकांच्या संवेदनशीलता आणि चिंतेचा आदर करताना शांततामय संवादाच्या माध्यमातून आपले मतभेद संपुष्टात आणण्यावर सहमती दर्शविली होती.

चिनी सैन्य तैनातीला भारताचा तीव्र विरोध

दरम्यान, यापूर्वी सूत्रांनी सांगितले होते की, चर्चेदरम्यान भारतीय प्रतिनिधी मंडळ पूर्व लडाखच्या गलवान घाटी, पँगाँग सरोवर आणि गोगरामध्ये पूर्वीसारखी स्थिती निर्माण करण्याची आक्रमक मागणी करेल. चिनी सैन्यांच्या घुसखोरीला विरोध करण्याबरोबरच भारतीय हद्दीत भारताद्वारे सुरू असलेल्या पायाभूत सुविधांच्या कामांना विरोध न करण्यास सांगेल.

चीनच्या कुरापती

चिनी लष्कराने पँगाँग सरोवर आणि गलवान व्हॅलीमध्ये सुमारे 2500 सैनिक तैनात केल्याचे सांगितले जात आहे. त्याशिवाय हळूहळू ते तात्पुरत्या पायाभूत सुविधा आणि शस्त्रास्त्रांची जमवाजमव वाढवत आहेत. सूत्रांनी सांगितले की, उपग्रहाच्या छायाचित्रांवरून समजते की, चीनने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेला (एलएसी) लागून असलेल्या भागात मोठ्या प्रमाणावर संरक्षण पायाभूत सुविधा वाढवल्या आहेत. यामध्ये पँगाँग सरोवर भागात  लष्करी हवाई तळाच्या आधुनिकीकरणाचाही समावेश आहे.

सध्याचा तणाव कशामुळे?

पूर्व लडाखमध्ये 5 आणि 6 मे रोजी भारत आणि चीनच्या सुमारे 250 जवानांदरम्यान हिंसक चकमक झाल्यानंतर दोन्ही देशांदरम्यान तणावाची परिस्थिती निर्माण झाली. पँगाँग सरोवर भागात झालेल्या या चकमकीनंतर 9 मे रोजी उत्तर सिक्‍कीममध्येही अशाच प्रकारची घटना घडली होती.

प्रत्यक्ष नियंत्रणरेषा ओलांडून चीनची 4 कि.मी. घुसखोरी

लडाखमध्ये असलेली प्रत्यक्ष नियंत्रणरेषा चिनी सैन्यांनी 3 ते 4 कि.मी. एवढी आतवर ओलांडून घुसखोरी केली आहे. गलवान, हॉटस्प्रिंग, पँगाँग सरोवर या भागात घुसखोरी करून चीनने मोर्चेबांधणी केली आहे. तोफा आणि चिलखती दल आणले आहेत. त्याबरोबर चिनी सैनिकांनी भारतीय चौक्याही उद्ध्वस्त केल्या आहेत.