होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ओबीसींच्या दहा हजार वैद्यकीय जागांची पळवापळवी! 

ओबीसींच्या दहा हजार वैद्यकीय जागांची पळवापळवी! 

Last Updated: Jun 06 2020 1:02AM

संग्रहित छायाचित्रमुंबई : पुढारी वृत्तसेवा

केंद्र सरकारने ओबीसींसाठी राखीव असलेल्या वैद्यकीय जागांवर या समाजातील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला नाही.  2017 पासून हा प्रकार सुरू असून ओबीसीऐवजी खुल्या वर्गातील सुमारे 10 हजार विद्यार्थ्यांना या जागांवर प्रवेश दिला असल्याचे समजते. देशपातळीवरील ऑल इंडिया फेडरेशन ऑफ अदर बॅकवॉर्ड क्लासेस वेल्फेअर असोसिएशनचे सरचिटणीस जी. करुणानिधी यांनी ही आकडेवारी जाहीर करून खळबळ उडवून दिली आहे.

काँग्रेसने 1991 मध्ये आणलेल्या नवीन आर्थिक धोरणानुसार कोणत्याही क्षेत्रातील आरक्षणाचा लाभ  संबंधित समाजालाच द्यावा,  असे निर्देश दिले होते. त्यानुसार आतापर्यंत ओबीसी समाजातील हजारो विद्यार्थी डॉक्टर झाले आहेत. पण केंद्र सरकारने एनईईटीला हाताशी धरुन कट ऑफमध्ये बदल घडवून त्या जागा खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांना बहाल केल्या आहेत, असा आरोप जळगावमधील सामाजिक कार्यकर्ते व्हि.डी. पाटील यांनी केला.

केंद्राच्या या पळवापळवीचा फटका  जळगावमधील दोडे गुजर समाजासह तेली, माळी, कुणबी, गुजर, लेवा आणि  सर्व ओबीसी जातींना बसला असल्याचेही पाटील म्हणाले. 1991-92 नंतर शैक्षणिक संस्थांमधे इतर मागासवर्गीयांना (ओबीसी) जागा ठेवण्याचा निर्णय होण्यापूर्वी दोडे गुजर जातीत फार कमी एमबीबीएस डॉक्टर्स होते. काँग्रेसच्या नव्या आर्थिक धोरणामुळे आर्थिक समृद्धी व शैक्षणिक जागृती झाली. त्यामुळे देश पातळीवरील सर्वच संस्थांमध्ये ओबीसींच्या जागा या समाजातील विद्यार्थ्यांनाच दिल्या जाऊ लागल्या. या पंधरा-वीस वर्षात ओबीसीमधील दोडे गुजर जातीमधील शेकडो विद्यार्थी एमबीबीएस,  एमडी, एमएस  आणि बीडीएस डॉक्टर्स झाले. देशभरात साधारणतः साडेदहा लाख एमबीबीएस म्हणजे अ‍ॅलोपथी डॉक्टर्स आहेत.पण आरक्षणाची प्रामाणिक अंमलबजावणी न केल्यामुळे त्यामध्ये ओबीसींची संख्या कमी असल्याचे पाटील म्हणतात.

पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रम (एमडी/एमएस)

वर्ष           एकूण जागा    खुला वर्ग     एससी    एसटी    ओबीसी    27% आरक्षण दिल्यास
2017-18    4941              3840         734      367              0        1334
2018-19    6858              5352         1018    488              0        1852
2019-20    7282              5674         1085    523              0        1966
2020-21    7981              6226         1180    575              0         2155
एकूण           27062        21092         4017    1953           0          7307