Thu, Jul 18, 2019 08:11होमपेज › Mumbai-Thane-Raigad › दहा महिन्यांत ७४७ जणांची ऑनलाईन फसवणूक

दहा महिन्यांत ७४७ जणांची ऑनलाईन फसवणूक

Published On: Dec 31 2017 2:07AM | Last Updated: Dec 31 2017 1:13AM

बुकमार्क करा
ठाणे : नरेंद्र राठोड

कॅशलेस व्यवहार करण्यावर शासन भर देत असले तरी कॅशलेस व्यवहारांमुळे अनेकांना फटका बसत असल्याच्या घटना समोर येत आहेत. बँकेतून बोलत असल्याचे सांगत तसेच इतर मार्गांनी काही भामटे भोळ्याभाबड्या जनतेला गंडवतात. ठाणे पोलीस आयुक्तालयात जानेवारी ते ऑक्टोबर 2017 या दहा महिन्यात तब्बल 747 जणांची ऑनलाईन बँकिंगद्वारे फसवणूक झाल्याच्या घटनांची नोंद झाली आहे.  विशेष म्हणजे ऑनलाईन फसवणुकीच्या दाखल गुन्ह्यात तब्बल 98 टक्के गुन्ह्यांचा उलगडाच होत नसल्याचे वास्तव स्वतः पोलीसच सांगतात.

मी तुमच्या खाते असलेल्या बँकेतून बोलतोय हा कॉल्स तुमच्या खात्याची माहिती पडताळणीसाठी करण्यात आला आहे. मला तुमचे खाते क्रमांक आणि क्रेडीट कार्ड, डेबिट कार्ड पिन क्रमांक कळेल का? अशी विचारणा करणारा कॉल अचानक तुम्हाला आला तर सावधान! तुमच्या बँक खात्याची कुठल्याही प्रकारची माहिती अशा फोन कॉल्सवरून देवू नका. अन्यथा मोठी फसवणूक होवू शकते. कारण अशा प्रकारे फोन कॉल्स करून बँक खात्याची माहिती मिळवून नंतर ऑनलाईन बँकिंगद्वारे फसवणूक करणार्‍यांची टोळीच सध्या मुंबई ठाण्यासह राज्यभरात कार्यरत आहे.  गेल्या काही दिवसांपासून मुंबई ठाण्यात बँकेच्या नावाने कॉल करून बँक खात्याची व क्रेडीट, डेबिट कार्डची माहिती मिळवणार्‍या काही टोळ्या सक्रीय झाल्या असून एकदा का या टोळीच्या हाती बँक खात्याची माहिती पडली की हे भामटे ऑनलाईन बँकिंगद्वारे खात्यातील पैशांची अफरातफर करतात. 

खात्याची माहिती मिळवणार्‍या व्यक्तींची गोड बोलण्याची पद्धत, इंग्रजीचा भाडीमार आणि आपले म्हणणे पटवून देण्याचे कसब यामुळे कुणीही व्यक्ती सहजच त्यांच्या भूलथापांना बळी पडतो. अशा प्रकारे भूलथापा देऊन गंडवण्याच्या 747 घटना जानेवारी ते ऑक्टोबर 2017 या कालावधीत घडल्या असून त्यांची पोलीसांत नोंद झाली आहे. दाखल गुन्ह्यांपेक्षा फसवणुकीच्या घटना कितीतरी अधिक पटीने जास्त आहेत. मात्र 70 टक्के लोक  पोलिसांत तक्रारच करत नसल्याची माहिती आर्थिक गुन्हे तज्ज्ञ अ‍ॅड. विकास पाटील यांनी दिली. पाटील यांच्या म्हणण्यानुसार, ऑनलाईन आर्थिक फसवणूक झाल्यानंतर पोलीस बँकेकडे तर बँक व्यवस्थापन पोलिसांकडे बोट दाखवत तक्रार घेण्याचे टाळतात. त्यामुळे अनेकजण फसवणुकीच्या तक्रारीच दाखल करीत नाहीत.