Fri, Apr 26, 2019 16:18होमपेज › Mumbai-Thane-Raigad › रेसकोर्सवर मेट्रोचा तात्पुरता बायपास

रेसकोर्सवर मेट्रोचा तात्पुरता बायपास

Published On: Jan 28 2018 1:33AM | Last Updated: Jan 28 2018 12:46AMमुंबई : प्रतिनिधी

कुलाबा-बांद्रा-सीप्झ या मेट्रो -3 मार्गाच्या कामात कोणताही अडथळा येऊ नये व हे काम सुलभतेने व्हावे यासाठी महालक्ष्मी रेसकोर्सच्या काही भागात तात्पुरता रस्ता बांधण्यात येऊन त्यावर वाहतूक वळविण्यात आली आहे. ही वाहतूक 15 जानेवारीपासून सुरू झाली असून रेसकोर्सच्या जागेवर बायपास रस्ता बांधण्यात आल्याने या मुद्द्यावर पुन्हा एकदा वाद होण्याची चिन्हे आहेत. 

एमएमआरसी(मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन)ने राखांगी चौक ते वरळी नाका या दरम्यान हा बायपास तयार केला आहे. त्यामुळे मेट्रो रेल्वेच्या ई मोजेस रोड व सायन्स म्युझियम येथे होणार्‍या अंडरग्राऊंड स्थानकांची कामे सुलभतेने होणार आहेत. महालक्ष्मी रेसकोर्सच्या काही भागातून तयार करण्यात आलेल्या या बायपाससाठी 10 कोटी रुपयांचा खर्च आला असून रेसकोर्स व्यवस्थापनाने याबाबत कोणताही आक्षेप घेतलेला नाही. 

एमएमआरसीने रेसकोर्सची 17000 चौरस मीटर जमीन ताब्यात घेतली असून त्यापैकी 5200 चौरस मीटर जमीन या बायपाससाठी वापरण्यात आली आहे. या रस्त्यावर 6.5 मीटरच्या दोन मार्गिका तयार करण्यात आल्या असून दुभाजक व फूटपाथही तयार करण्यात आले आहेत. एमएमआरसी उर्वरित जागेचा वापर खोदकाम करण्यासाठी वापरण्यात येणारी यंत्रे ठेवण्यासाठी करणार आहे. मेट्रो -3 चा टप्पा अंडरग्राऊंड असून 33.5 किमीचा आहे. या मार्गामुळे दक्षिण मुंबई व पश्‍चिम उपनगरे जोडली जाणार आहेत. रेसकोर्स मैदान सध्या रॉयल वेस्टर्न टर्फ क्‍लबच्या ताब्यात आहे. 2013 मध्ये हे मैदान चर्चेत आले होते. त्यावेळी रॉयल वेस्टर्न टर्फशी असलेला 100 वर्षांचा करार संपुष्टात आला होता. या कराराचे नूतनीकरण करायचे नाही, अशी भूमिका मुंबई महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने घेतली आहे. शिवसेनेचा तेथे थीमपार्क उभारण्याचा मानस आहे. हा वादाचा मुद्दा झाला असून 2014 मध्ये सत्तेत आलेले भाजप सरकार मैदान पुन्हा भाड्याने देण्याच्या कराराच्या नूतनीकरण मुद्द्यावर अडून बसले आहे. विशेष म्हणजे रेस कोर्सवरची 8.55 लाख चौरस मीटर जागा ही ओपन स्पेस आहे. तर, 2.58लाख चौरस मीटर जागेवर मुंबई महापालिकेने दावा सांगितला आहे. तसेच, उर्वरित 5.97 लाख चौरस मीटर जागेची मालकी राज्य सरकारकडे आहे.