होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईत मेट्रो-१ मार्गिकेवर तांत्रिक बिघाड 

मुंबईत मेट्रो-१ मार्गिकेवर तांत्रिक बिघाड 

Published On: Jan 11 2019 2:00PM | Last Updated: Jan 11 2019 2:00PM
मुंबई : प्रतिनिधी 

घाटकोपर ते वर्सोवा या मेट्रो-१ मार्गावर शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास एका मेट्रोमध्ये तांत्रिक कारणामुळे बिघाड झाला. या तांत्रिक बिघाडामुळे मेट्रो सेवा सकाळी काही काळ विस्कळीत झाली. यामुळे सर्व प्रवाशांना एअरपोर्ट रोड स्थानकावर उतरवण्यात आले. पाच मिनिटात मेट्रो सेवा पूर्ववतही करण्यात आली. ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांच्या अडचणीत भर पडल्याने प्रवाशांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागला. आता सर्व मेट्रो आपल्या वेळेत धावत असल्याचे मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडच्यावतीने (एमएमओपीएल) सांगण्यात आले आहे. 

बेस्टमधील कर्मचाऱ्यांच्या संपाने सलग चौथ्या दिवशी मुंबईकरांना वेठीस धरले असतानाच घाटकोपर- वर्सोवा मार्गावरील मेट्रो सेवा तांत्रिक बिघाडामुळे विस्कळीत झाली. बंद पडलेल्या मेट्रोतून सर्व प्रवाशांना एअरपोर्ट रोड स्थानकावर उतरवण्यात आल्यानंतर ही मेट्रो यार्डामध्ये दुरूस्तीसाठी नेण्यात आली. यानंतर पाच मिनिटामध्ये मेट्रो सेवा पूर्ववतही करण्यात आली. मात्र याचा मेट्रोच्या सेवेवर काही काळ परिणाम झाला. सकाळी बेस्ट आणि मेट्रो बंद असल्याने आपल्या कार्यालयात जाण्यास निघालेल्यांचे मात्र खूप हाल झाले.