Sun, Jan 19, 2020 15:20होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शिक्षकांना वेतन दिलासा

शिक्षकांना वेतन दिलासा

Published On: Jul 23 2019 1:27AM | Last Updated: Jul 23 2019 1:36AM
मुंबई : विशेष प्रतिनिधी

महाराष्ट्र खासगी शाळा अधिनियमातील सुधारणेमुळे अनुदानित शाळांमधील शिक्षकांच्या वेतनामध्ये कोणताही बदल होणार नाही, असा दिलासा शालेय शिक्षण विभागाने दिला आहे. 22 फेब्रुवारी 2019 रोजीच्या शासन निर्णयान्वये सातव्या वेतन आयोगाचा लाभ शिक्षकांना देण्यात आला असून त्यामध्ये कोणताही बदल या अधिसूचनेमुळे होणार नाही. याउलट सदर सुधारणेमुळे आता खासगी विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांनाही अनुदानित शाळांमधील शिक्षकांप्रमाणे वेतन आयोगाचा लाभ मिळणार आहे.

महाराष्ट्र खासगी शाळा अधिनियम 1977, नियमावली 1981 मधील नियम राज्यातील खासगी विनाअनुदानित तसेच अनुदानित शाळांतील शिक्षकांना लागू आहेत.  या नियमामधील नियम 7 मध्ये वेतनश्रेणी व भत्ते याबाबतची तरतूद केलेली आहे. राज्य  शासकीय कर्मचारी व इतर पात्र कर्मचारी यांना केंद्र शासनाने वेळोवेळी नेमलेल्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार राज्य शासनाकडून सुधारित वेतनश्रेण्या लागू केल्या जातात. यानुसार शालेय शिक्षण विभागाकडून अनुदानित व विनाअनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांना सुधारित वेतनश्रेण्या लागू करण्यासंदर्भात शासन निर्णय निर्गमित केले जातात. परंतु, चौथ्या वेतन आयोगाच्या वेतनश्रेण्या लागू केल्यानंतर यामध्ये सुधारणा करण्यात आलेली नव्हती.

शालेय शिक्षण विभागाअंतर्गत अशासकीय अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, व उच्च माध्यमिक शाळा तसेच अध्यापक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांना शालेय शिक्षण विभागाकडून  वेळोवेळीच्या  शासन निर्णयान्वये सुधारित वेतनश्रेण्या लागू करण्यात आलेल्या असून अनुदानित शाळांमधील कर्मचार्‍यांना या शासन निर्णयानुसार सुधारित वेतनश्रेणीचा लाभ दिला जातो. उच्च न्यायालयाने महाराष्ट्र खासगी शाळा अधिनियम 1977, नियमावली 1981 च्या परिशिष्ट - क (Schedule -C) मध्ये सुधारणा करण्यासाठी शासनाने योग्य ती पावले उचलावित असे आदेश दिलेले होते.