Wed, Jul 24, 2019 01:53होमपेज › Mumbai-Thane-Raigad › निवडणुकीची कामे शिक्षकांच्याच माथ्यावर

निवडणुकीची कामे शिक्षकांच्याच माथ्यावर

Published On: May 20 2018 1:43AM | Last Updated: May 20 2018 1:24AMमुंबई : प्रतिनिधी

राज्यात होणार्‍या शिक्षक व पदवीधर निवडणुकीच्या कामासाठी शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या प्रशिक्षणासाठी 22 मे रोजी त्यांना वांद्रे येथील मध्यवर्ती निवडणूक कार्यालयात उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ऐन सुटीत शिक्षक मतदारांना निवडणुकीची कामे करावी लागणार असल्याने शिक्षकांनी जोरदार आक्षेप घेतला आहे.

निवडणूक कार्यालयाद्वारे  मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या पत्राचा संदर्भ घेऊन मुंबई मधील शाळांना आलेले परिपत्रकाने शिक्षकांची झोप उडाली आहे. मुख्याध्यापक संघटनेने याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे.  दोन दिवसांपूर्वी आलेल्या या आदेशामुळे सुट्टीवर असलेल्या शिक्षकांना तातडीने मुंबईकडे रवाना व्हावे लागले तर काही शिक्षकांपर्यंत मुख्याध्यापक अद्याप पोहोचू शकलेले नाहीत.

यामुळे निवडणूक अधिकार्‍यांना काय उत्तर द्यावे असा प्रश्न मुख्याध्यापकांसमोर उभा राहिला आहे.राज्यात जून महिन्यात शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीच्या कामासाठी नमुना 18 व 19 चे अर्ज स्वीकारणे, नोंदणीपासून वंचित राहिलेल्या पात्र मतदारांची तसेच ओळखपत्रांचे दुरुस्ती अर्ज स्वीकारणे. ऑनलाइन तसेच ऑफलाइन अर्जांची घरोघरी जाऊन पडताळणी करणे, मतदार ओळखपत्रांचे वाटप करणे, फोटो जमा करणे, मतदार याद्यांची पडताळणी करणे, दिव्यांग मतदारांचा शोध घेणे अशा विविध कामांसाठी शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या शिक्षकांना 22 मेपासून ही जबाबदारी पार पाडायची आहे. यासाठी मतदार नोंदणी अधिकार्‍यांनी मुख्याध्यापकांना पत्र पाठविले आहे. तसेच या कामासाठी 22 मे रोजी जे उपस्थित राहणार नाहीत ते फौजदारी व दंडनीय कारवाईस पात्र राहतील, असेही या पत्रात नमूद केले आहे. हे पत्र 15 मे रोजी प्राप्त झाल्यामुळे तोपर्यंत अनेक शिक्षक गावाला पोहोचले होते. अनेकांच्या गावात फोनला रेंज नाही तर अनेकांनी आपले फोन बंद ठेवले आहेत. यामुळे या शिक्षकांशी मुख्याध्यापकांचा संपर्कच होऊ शकत नाही. यामुळे मुख्याध्यापक हतबल झाले आहेत.