Wed, Apr 24, 2019 00:02होमपेज › Mumbai-Thane-Raigad › डोंबिवलीतील शिक्षकाचे विद्यार्थिनींशी अश्‍लील वर्तन

डोंबिवलीतील शिक्षकाचे विद्यार्थिनींशी अश्‍लील वर्तन

Published On: Feb 24 2018 1:36AM | Last Updated: Feb 24 2018 1:03AMकल्याण/डोंबिवली ः वार्ताहर

विद्यार्थिनींसोबत शिक्षकानेच गैरवर्तन करून गुरु-शिष्याच्या नात्याला काळिमा फासल्याचा प्रकार सांस्कृतिक शहर अशी ख्याती असलेल्या डोंबिवलीतील ख्यातनाम शाळेत उघडकीस आला आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली असून पोलिसांनी नराधम शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे. रघुनाथ हरड असे या नराधम शिक्षकाचे नाव आहे. 

डोंबिवली पूर्वेकडील दवडी परिसरातील असलेल्या आर. टी. पी. विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय या नामांकित शाळेमध्ये तब्बल 7 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळेचा शिक्षक रघुनाथ हरड हा गेल्या काही महिन्यांपासून शाळकरी विद्यार्थिनींसोबत अश्लील चाळे करत त्यांच्याशी लगट करण्याचा प्रयत्न करत होता. 8 फेब्रुवारीला एका एनजीओने या शाळेत सर्व्हे केला होता. त्या सर्व्हेदरम्यान विद्यार्थिनींना सुरक्षित स्पर्श व असुरक्षित स्पर्श याबाबत माहिती देत व्हिडीओे दाखवत असताना चार मुलींनी एनजीओच्या कार्यकर्त्यासमोर आपल्यासोबत होत असलेल्या गैरवर्तनासंदर्भात माहिती दिली होती.

सदर संस्थेने शाळेला याबाबत कल्पना देताच शाळा प्रशासनाने हरडवर महिनाभरासाठी निलंबनाची कारवाई केली. मात्र याबबत पोलीस स्थानकात तक्रार न करता हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. यानंतर पीडित विद्यार्थिनींच्या पालकांनी नगरसेवक कुणाल पाटील यांच्या निदर्शनास ही बाब आणून देताच त्यांनी पुढाकार घेत मानपाडा पोलीस स्टेशन गाठून हरडविरोधात तक्रार दिली. याप्रकरणी हरडसह जे शिक्षक जबाबदार आहेत, त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी पालकांनी केली आहे.