होमपेज › Mumbai-Thane-Raigad › विद्यार्थ्यांचे प्रोजेक्ट हवेत भिरकावले

विद्यार्थ्यांचे प्रोजेक्ट हवेत भिरकावले

Published On: Feb 07 2018 1:38AM | Last Updated: Feb 07 2018 1:04AMवाडा : वार्ताहर

शिक्षण व शिक्षक यांचा आदर करणे हे आपल्याला खूप पूर्वीपासून शिकवले जात असून सर्वचजण या गोष्टीचे भान ठेवून असतात. पण वाड्यातील एका शाळेत शिक्षकाने 11वीच्या विद्यार्थ्यांचे प्रोजेक्ट हवेत भिरकवल्याचा व्हिडीओ पाहिल्यावर हा शैक्षणिक साहित्याचा अवमान आहे की शिक्षणाचा माज? अशी शंका येते.  

वाड्यातील आ. ल. चंदावरकर या नामांकीत शाळेत अकरावीच्या वर्गातील शिक्षक मुलांचे प्रोजेक्ट तपासात आहेत व क्रमांक पुकारून ते हवेत भिरकावून देत आहेत, असा व्हिडीओ व्हायरल झाला. खरंतर शैक्षणिक साहित्याचा अशाप्रकारे शिक्षकानेच अपमान करणे व आपली मुजोरी दाखविणे हा संतापजनक प्रकार आहे. तसेच या सगळ्या प्रकाराचा वर्गात व्हिडीओ बनविणे व तो सोशल मीडियावर व्हायरल करणे हेही अतिशय बेशिस्त व चिंताजनक आहे. याबाबत शाळेच्या मुख्याध्यापिका भंगाळे यांच्याशी संपर्क केला असता घरत नामक ज्या शिक्षकाने हा प्रकार केला, त्यांनी घडलेल्या प्रकाराबाबत माफी मागून दिलगिरी व्यक्त केली आहे. याबाबत आम्ही त्यांच्याकडून खुलासा मागितला असून शाळा व्यवस्थापन यावर योग्य ती कारवाई नक्की करील, असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, शाळेत असे मुजोर प्रकार होऊ नयेत याची शिक्षकांनी काळजी घ्यावी. शिवाय मोबाईल शाळेत घेऊन येणे व त्यांचा नको त्या ठिकाणी वापर करणे विद्यार्थ्यांनी टाळावे यासाठी शाळेने कठोर पावले उचलावीत, अशी मागणी केली जात आहे.