Wed, Jul 17, 2019 20:39होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शिक्षकांचे पगार एप्रिलपर्यंत ऑफलाईन

शिक्षकांचे पगार एप्रिलपर्यंत ऑफलाईन

Published On: Feb 24 2018 1:36AM | Last Updated: Feb 24 2018 1:21AMमुंबई : प्रतिनिधी

शालार्थ प्रणालीच्या डाटाबेस सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक दोष निर्माण झाल्यामुळे मागील दोन महिन्यांपासून राज्यभरातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या पगाराचे घोळ सुरू होते. राज्यभरातील शिक्षकांच्या तक्रारी लक्षात घेऊन शालेय शिक्षण विभागाने अखेर एप्रिल 2018 पर्यंत पगार ऑफलाईन करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील शासन निर्णय शुक्रवारी जारी केला आहे.

राज्यातील जिल्हा परिषदा व नगर परिषदांमधील 3.50 लाख तर अनुदानित शिक्षण संस्थांमधील 2 लाख शिक्षकांचे पगार गेले दोन महिने वेतन वितरणाचे सॉफ्टवेअर करप्ट झाल्याने होऊ शकलेले नाहीत. त्यामुळे शिक्षक हवालदिल झाले आहेत. पगार वितरणाचे सॉफ्टवेअर पूर्ववत होईपर्यंत पगार बिले ऑफलाईन घेण्याबाबत आदेश द्यावेत, अशी मागणी शिक्षक संघटना आणि आमदारांनी केली होती. 22 तारीख उलटून गेली तरी पगार बिले स्वीकारली गेलेली नसल्याने शिक्षक भारती या संघटनेने शालार्थ प्रणाली पूर्ववत होईपर्यंत पगार बिले ऑफलाईन घेण्याची मागणी केली होती. तसेच बिलं स्वीकारण्याबाबत त्वरित आदेश न दिल्यास शिक्षणमंत्र्यांना घेराव घालण्याचा इशाराही दिला होता, अखेर एप्रिल 2018 पर्यंत पगार ऑफलाईन घेण्याचे आदेश निघाले आहेत.  

तर शालार्थमधील बिघाडामुळे राज्यातील शिक्षकांचे वेतन एप्रिलपर्यंत ऑफलाईन करण्याचा शासन निर्णय आज शालेय शिक्षण विभागाने घेतला असल्याने राज्यातील सुमारे 5 लाख 70 हजार शिक्षक व शिक्षकेतरांचे वेतन वेळेवर होणार असल्याचे शिक्षक परिषद मुंबई विभागाचे अनिल बोरनारे यांनी सांगितले.