Wed, Sep 19, 2018 16:41होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अर्धा महिना संपला तरी शिक्षकांचा पगारच नाही

अर्धा महिना संपला तरी शिक्षकांचा पगारच नाही

Published On: Feb 20 2018 2:00AM | Last Updated: Feb 20 2018 1:53AMमुंबई : प्रतिनिधी

शालार्थ सॉफ्टवेअर बंद पडल्याने राज्यभर शिक्षकांचे पगार उशिरा होत आहे. अर्धा महिना संपला तरीही पगार झालेले नाहीत. त्यामुळे आर्थिक गणित कोलमडल्याने शिक्षक प्रचंड अस्वस्थ आहेत. पगार रखडल्यानंतर उशिरा जाग आलेल्या शिक्षण विभागाने ऑफलाईन पगाराचे आदेश दिले, मात्र त्याबाबत वित्त विभागाकडे पाठपुरावा केलेला नाही.अजूनही शालार्थ सॉफ्टवेअर बंद आहे, पुढच्या महिन्यातही ऑफलाईन पगार होणार असल्याने शिक्षकांची चिंता वाढली आहे. शिक्षण विभागाच्या ढिम्म कारभाराचा फटका राज्यातील शिक्षकांना बसत आहे.

गेली सहा वर्षे सुरळीत होत असलेले मुंबईतील शिक्षकांचे पगार शिक्षण विभागाने राष्ट्रीयीकृत बँकेतून मुंबई जिल्हा बँकेत ढकलले. आंदोलनं, निदर्शने, पत्रव्यवहार, वरिष्ठ मंत्र्यांच्या भेटीगाठी घेतल्या, पण शिक्षण विभाग दाद द्यायला तयार नाही. अखेर शिक्षक भारतीने मुंबई हायकोर्टात रीट याचिका दाखल केली. 

नुकताच झालेल्या निकालात हायकोर्टाने मुंबईतील शिक्षकांच्या बाजूने निर्णय देत शिक्षण विभागाला चपराक दिली आहे. मुंबई जिल्हा बँकेत पगार नेण्याचा निर्णय रद्द केला आहे. आता कोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी करून शिक्षण विभागाने मुंबईतील शिक्षकांचे पगार पूर्ववत तातडीने युनियन बँकेतून केले पाहिजेत, असे मत शिक्षक संघटनांनी व्यक्त केले आहे.