Thu, Apr 25, 2019 13:58होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शिक्षक उपसंचालक कार्यालयासमोर निदर्शने

शिक्षक उपसंचालक कार्यालयासमोर निदर्शने

Published On: Jan 09 2018 2:03AM | Last Updated: Jan 09 2018 1:24AM

बुकमार्क करा
माटुंगा : वार्ताहर

शाळा बंदच्या सरकारच्या भूमिकेला विरोध करण्यासाठी  सोमवारी छात्र भारती आणि शिक्षक भारतीच्या कार्यकर्त्यांनी मुंबईच्या शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर निदर्शने केली. याचा निषेध म्हणून उद्या राज्यातील सर्व शिक्षक सकाळी 11 वाजता घंटानाद करत काळ्या फिती लावून काम करतील, अशी माहिती शिक्षक भारतीचे प्रमुख कार्यवाह जालिंदर सरोदे यांनी दिली.

शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे, कार्यवाह प्रकाश शेळके, मुंबई अध्यक्ष शशिकांत उतेकर, मच्छींद्र खरात, चंद्रकांत म्हात्रे, शिवाजी खैरमोडे, शिवाजी आव्हाड, छात्रभारतीचे मुंबई अध्यक्ष सचिन बनसोडे, सागर भालेराव, रोहित ढाले, विशाल कदम, सचिन काकड, भगवान बोयाळ, समीर कांबळे यांना मरीन लाईन्स पोलिसांनी ताब्यात घेतले.

औरंगाबाद येथे झालेल्या बैठकीत राज्यातील 80 हजार शाळा बंद करण्याची भाषा करणार्‍या राज्याचे शिक्षण सचिव नंदकुमार यांना तात्काळ हटवण्याची मागणी शिक्षक भारतीने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.  शासनाने गुणवत्तेचे कारण देत दहा पेक्षा कमी पटसंख्या असणार्‍या 1300 शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याला शिक्षक भारतीने तीव्र विरोध केला होता.  1300 शाळा बंद करण्याचा निर्णय सरकारने नुकताच जाहीर केला आहे. त्याविरोधात छात्र भारतीने आक्रमक भूमिका घेतली आहे. गरीब, आदिवासी मुलांचे शिक्षण उद्ध्वस्त करण्याचा सरकारचा डाव आम्ही उधळून लावू, एकही शाळा बंद करु देणार नाही, असा इशारा छात्र भारतीचे मुंबई अध्यक्ष सचिन बनसोडे यांनी दिला आहे.