Wed, Apr 24, 2019 01:32होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बदली करा किंवा आम्हाला घटस्फोट मिळवून द्या !

बदली करा किंवा घटस्फोट द्या; शिक्षक दाम्पत्यांची मागणी

Published On: Aug 31 2018 2:09AM | Last Updated: Aug 31 2018 2:09AMमुंबई : पुढारी वृत्तसेवा

राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये असे हजारो शिक्षक पती-पत्नी आहेत जे अनेक वर्षांपासून एकमेकांपासून शेकडो किलोमीटर दूर राहून मुलांना शिकवण्याचे काम करत आहेत. आता अशा शिक्षक पती-पत्नींनी आक्रमक पवित्रा घेत दोघांची नियुक्ती एकाच ठिकाणी करावी, अन्यथा येत्या दिवाळीमध्ये सरकारला घटस्फोटासाठी निवेदन देण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. 

अशा शिक्षकांची संघटना असलेल्या ‘महाराष्ट्र राज्य आंतर जिल्हा पती-पत्नी एकत्रिकरण संघर्ष समिती’च्या नेतृत्वाखाली नुकतेच ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची भेट घेवून याबाबत निवेदन देण्यात आले. सामाजीक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी या समितीची स्थापना केली आहे. 

जीवनसाथीपासून तोडू नका

विशेष म्हणजे महाराष्ट्रात शिक्षक पती,पत्नी यांची बदली जिल्ह्यांतर्गत 30 किमीच्या आत करावी असे आदेश यापूर्वीच देण्यात आले आहेत. असे असताना आजही अनेक शिक्षक पती-पत्नी एकमेकांपासून 200 ते 1000 किमी अंतरावर अध्यापनाचे काम करत आहेत. 

राज्यात आजही असे शिक्षक पती-पत्नी आहेत जे गेल्या 15 वर्षांपासून एकमेकांपासून शेकडो किमी अंतरावर राहून मुलांना शिकवण्याचे काम करत आहेत. इतकी वर्षे एकमेकांपासून दूर राहूनही अजूनही त्यांची एकाच ठिकाणी नियुक्ती होत नसल्याने अशा नाराज शिक्षक पती-पत्नींकडून सरकारकडे घटस्फोट मिळवून देण्याची मागणी करण्यात येत आहे.