Tue, Jul 16, 2019 23:53होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईत टाटांची वीज महागली

मुंबईत टाटांची वीज महागली

Published On: Sep 13 2018 2:14AM | Last Updated: Sep 13 2018 2:14AMमुंबई : विशेष प्रतिनिधी

राज्यात विविध प्रकारचे सण सुरु असताना महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने वीज दरवाढ करुन घरगुती, कृषी व औद्योगिक ग्राहकांना शॉक दिला आहे. औद्योगिक, वाणिज्य व लघु उद्योग क्षेत्रात टाटा पॉवर व महावितरणने वाढ केली आहे, तर बेस्ट आणि अदानीने आपल्या ग्राहकांना दिलासा दिला आहे.     

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या कृषी क्षेत्राचे वीजदर 3 रुपये 35 पैशांवरून 3 रुपये 55 पैसे प्रतियुनिट असे करण्यात आले आहे, तर घरगुती वीज ग्राहकांचे 0 ते 100 युनिटसाठी 5 रुपये 07 पैशांवरून 5 रुपये 31 पैसे तर 101 ते 300 युनिटसाठी 8.74 रुपयांवरुन 8.95 रुपये प्रतियुनिट दर जाहीर करण्यात आला आहे.उत्तर मुंबईतील अदानी इलेक्ट्रिसिटी व टाटा पॉवरच्या विजेच्या दरात 0 ते 1 टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. नवीन दर  1 सप्टेंबरपासून लागू करण्याचे निर्देश वीज नियामक आयोगाने दिले आहेत. 

वीज नियामक आयोगाचे अध्यक्ष आनंद कुलकर्णी यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ही दरवाढ जाहीर करत असतानाच त्यांनी बेस्टच्या विजेचे दर 6 ते 8 टक्क्यांनी कमी केले असल्याचे सांगत दक्षिण मुंबईतील काही ग्राहकांना दिलासाही दिला.

इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी वीज वापरामध्ये अनुदानित दर ठेवण्यात आले आहेत. इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंग स्टेशनसाठी प्रतियुनिट 6 रुपये दर ठरविण्यात आला असून स्थिर आकार (डिमांड चार्जेस) 70 रुपये प्रतिकेव्हीए असा ठरविण्यात आला असल्याचेही कुलकर्णी यांनी सांगितले.