टाटाचे रुग्ण, नातलग कोरोनाच्या महासंकटातही मुंबईच्या पदपथांवरच

Last Updated: Mar 30 2020 1:11AM
Responsive image


मुंबई : तन्मय शिंदे

कॅन्सरवरील उपचारांसाठी देशभर प्रसिद्ध असलेल्या टाटा मेमोरियल रुग्णालयात महाराष्ट्र सह विविध राज्यांतून शेकडो कर्करोगग्रस्त रुग्ण दाखल होतात. मात्र त्यांच्या राहण्याची व्यवस्था रुग्णालय,पालिका आणि राज्य सरकारकडून होत नसल्याने या रुग्णांना व रुग्णांच्या नातेवाइकांना अखेर रुग्णालयासमोरील पदपथाचा आधार घ्यावा लागतो. कोरोनाचे सावट असूनही हे रुग्ण व त्यांचे नातेवाईक सध्या रुग्णालयासमोरील पदपथावर जीव मुठीत घेऊन राहात आहेत.

राज्याच्या कानाकोपर्‍यातून आलेल्या तसेच परराज्यातील नागरिकांना महागड्या लॉजचे भाडे परवडत नाही.तसेच धर्मशाळेची माहिती नाही, तर माहिती असलेल्या धर्मशाळेत जागा नाहीत अशी काहीशी त्यांची स्थिती दिसून येत आहे. परिणामी नाका-तोंडाला लावलेल्या नळ्यांसह रुग्ण पदपथांचा आधार घेत आहेत. त्यांच्यासोबत कुटुंबातील काही सदस्य असतात. त्यामुळे काही महिने मुंबईत काढायचे तर होणारा अवाच्या सव्वा खर्च परवडत नसल्याने रस्त्यावरच राहिलेले बरे म्हणून हे रुग्ण व त्यांचे कुटुंबीय पदपथांवर दिवस कंठत आहेत.

गेल्या दोन महिन्यांपासून औरंगाबादहून शेख अनिस टाटा रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांना गळ्याचा कॅन्सर असून 2011साली त्यांच्यावर ट्रीटमेंट झाली होती. मात्र हा रोग पुन्हा उद्भवला आणि तीन महिन्यांपासून पुन्हा टाटा रुग्णालयात उपचार घेत आहेत. सध्या नाकात नळी असून उपचारासाठी दोन ते तीन दिवसांनी रुग्णालयात जावे लागते. त्यामुळे दरवेळी औरंगाबादवरून जाऊन येणे शक्य नाही. त्यामुळे अनिस सोबत आम्ही पदपथावर कसेबसे दिवस काढत आहोत. आम्हाला रुग्णालयात आणि धर्मशाळेत जागा मिळाली नाही. मात्र काही संस्था या ठिकाणी दोन वेळेस जेवण उपलब्ध करून देत आहेत. कोरोनाचे सावट असले तरी अनिसही बरा होणे आम्हाला तितकेच महत्त्वाचे आहे. असे त्याच्या कुटुंबातील झिशान शेख यांनी सांगितले.

गेल्या पंधरा दिवसांपासून यूपीतील बालिया जिल्ह्यातून आलेले सुरेंद्र केसरी यांना गुदद्वाराचा कर्करोग आहे. मात्र कोरोना व्हायरसमुळे दोन दिवसांपासून पोलीस आणि पालिका कर्मचारी जेवण देण्यासाठी येणार्‍यांला वारंवार सूचना करत आहेत. तसेच रांग लावून जेवण देण्यास सांगत आहेत. आम्ही बिहारवरून आलो असल्याने मुंबईतील माहिती नाही. त्यामुळे पदपथाचा आधार घेतला आहे. असे सुरेंद्रचे नातेवाईक सोनू केसरी यांनी सांगितले.

माझ्या नवर्‍याला ब्रेन ट्युमर आहे.त्यामुळे केमोथेरपी द्यावी लागत आहे. मला हिंदीही नीट समजत नाही. त्यामुळे अडचणी येत आहेत. सर्व पदपथावर राहात असल्याने आम्हीही पदपथावर राहत आहोत. राहण्याची व्यवस्था होण्याची गरज आहे.बंगालहून आलेल्या शुल्काबाला शिलीबुडी यांनी सांगितले.articleId: "185567", img: "Article image URL", tags: "Tata Patients and patients' relatives Finally the basis of the walkway to the hospital",