Sun, Apr 21, 2019 03:51होमपेज › Mumbai-Thane-Raigad › देशातील महत्त्वाची ठिकाणे टार्गेट; ‘रेकी’ही केली होती

देशातील महत्त्वाची ठिकाणे टार्गेट; ‘रेकी’ही केली होती

Published On: Aug 22 2018 1:37AM | Last Updated: Aug 22 2018 1:32AMमुंबई : प्रतिनिधी

नालासोपारा स्फोटकांप्रकरणी अटक केलेली टोळी ही महाराष्ट्रासह देशभरामध्ये घातपाती कारवाया करण्याच्या हेतूने एकत्र आलेली कट्टर हिंदू विचारसरणीच्या तरुणांची संघटना असून, त्यांनी देशभरातील टार्गेटची रेकी केली आहे. ही टोळी उच्च दर्जाची प्रशिक्षित असून, थंड डोक्याने आणि कोडवर्डमध्ये (सांकेतिक भाषेत) काम करत असून, टोळीने पुण्यासह सातारा, औरंगाबाद आणि नालासोपारा हे आपले कारवायांचे तळ बनविले असल्याची धक्‍कादायक माहिती राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) केलेल्या तपासात उघड झाली आहे. 

घातपाती कारवाया करण्याच्या तयारीत असल्याच्या मिळालेल्या गुप्‍त माहितीवरून एटीएसने 9 आणि 10 ऑगस्टला नालासोपारा आणि पुण्यामध्ये छापे टाकत वैभव राऊत, शरद कळसकर आणि सुधन्वा गोंधळेकर यांना अटक केली. त्यांच्याजवळून एटीएसने मोठ्या प्रमाणात स्फोटके, स्फोटकांचे साहित्य आणि शस्त्रसाठ्यासह महत्त्वाचे दस्तऐवज जप्‍त केले.

या टोळीतील वरील तिन्ही अटक आरोपींच्या कसून तपासात जालन्यातील सेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकर याचे नाव समोर येताचएटीएसने त्यालाही बेड्या ठोकल्या. या टोळीला आर्थिक रसद पुरविण्यासोबतच कारवायांच्या कामामध्ये सोबत करण्याचे काम पांगरकर करत होता. त्याच्याप्रमाणेच अन्य सदस्यांनाही कामे सोपिण्यात आली होती. शस्त्रे चालविण्याचे उच्च दर्जाचे प्रशिक्षण महाराष्ट्रासोबतच राज्याबाहेर देण्यात आले आहे. तसेच या टोळीने गेल्या दीडएक वर्षापासून राज्यासह देशभरामध्ये फिरून ठिकाणांची रेकी केल्याचे एटीएसच्या तपासात स्पष्ट झालेआहे.