Wed, Apr 24, 2019 22:21होमपेज › Mumbai-Thane-Raigad › तानसाही ओसंडून वाहू लागले

तानसाही ओसंडून वाहू लागले

Published On: Jul 18 2018 2:18AM | Last Updated: Jul 18 2018 2:18AMमुंबई :  प्रतिनिधी  

मुंबईला पाणीपुरवठा कसरणार्‍या प्रमुख धरणांपैकी तानसा धरणही मंगळवारी ओसंडून वाहू लागले. याआधी मोडकसागर धरण रविवारी भरले असून दोन्ही धरणांचे दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत. मुंबईकरांना सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी वर्षाकाठी 14 लाख 37 हजार दशलक्ष जलसाठा लागतो. आतापर्यंत 10 लाख 31 हजार दशलक्ष लिटर पाणी साठा धरणांमध्ये जमा झाला आहे. आता मोडकसागर व तानसा ही प्रमुख धरणे भरल्यामुळे मुंबईकरांना काहीअंशी दिलासा मिळाला असून लवकरच मध्य वैतरणा, भातसा ही धरणेदेखील भरून वाहण्याची चिन्हे आहेत.

मुंबईवरील पाणीटंचाईचे सावट दूर

मुंबई/कसारा : प्रतिनिधी 

मुंबई शहराला पाणीपुरवठा करणार्‍या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस पडल्यामुळे पाण्याच्या साठ्याने 10 लाख दशलक्ष लिटर्सचा टप्पा ओलांडला आहे. 2017 च्या तुलनेत यंदा 50 हजार दशलक्ष लिटर्सने पाणीसाठ्यात अधिक वाढ झाली आहे. मंगळवारी सकाळी तानसा तलावही वाहू लागल्यामुळे मुंबईकरांचे पाणी टंचाईचे संकट दूर होणार आहे.

मोडकसागर धरणाचे दोन दरवाजे रविवारी उघडण्यात आले. चवथ्या क्रमाकांचा दरवाजा 5 फूट, तर  पाचव्या क्रमांकाचा दरवाजा 6 फुटाने उघडण्यात आला असून धरणातून पाण्याचा विसर्ग 3269 एम.जी. एवढा करण्यात आला आहे. सदर धरण भरल्यानंतर यातील पाणी पाईपलाईनमार्गे तानसा धरणात सोडण्यात येते. मोडकसागर धरणाचे पाणी व सुरू असलेली पावसाची संततधार यामुळे तानसा धरणही मंगळवारी (दि.17) सकाळी 6 वाजून 15 मिनिटांनी भरले. त्यामुळे  या धरणाचे 9 आणि 10 क्रमांकाचे दरवाजे उघडण्यात आले असून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. 

दोन्ही धरण भरल्यामुळे या परिसरातील  संबंधित सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील, कोतवाल यांना सतर्क राहण्याच्या सूचना शहापूर तहसीलदार रवींद्र बाविस्कर यांनी दिल्या आहेत.  वैतरणा नदी वाडा व पालघर तालुक्यातून जाते, येथील तहसीलदारांनी देखील नदीकाठच्या गावांना तसेच तानसा नदी आंबाडी, गणेशपुरी,अकलोली या परिसरातून जाते. त्यामुळे भिवंडी तहसीलदारांनी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहेत.

मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या तलाव परिसरात 1404 मिमी ते 2745 मिमी इतका पाऊस झाला आहे. त्यामुळे पाण्याची पातळी अवघ्या महिनाभरात 70 टक्क्यांवर पोहोचली आहे. 17 जुलै 2017 मध्ये सातही तलावांतील पाणीसाठा 9 लाख 84 हजार 556 दशलक्ष लिटर्सपर्यंत पोहोचला होता. यावेळी हा साठा 10 लाख 34 हजार 571 वर पोहचला आहे. त्यामुळे सर्व तलाव ओसंडून वाहायला अजून 4 लाख दशलक्ष लिटर्स पाणी साठ्याची आवश्यकता असल्याचे पालिकेच्या जल अभियंता विभागाकडून सांगण्यात आले. 

दरम्यान शहराला दररोज 450 दशलक्ष लिटर्स पाणीपुरवठा करणारा तानसा तलाव मंगळवारी सकाळी 6.15 वाजता भरून वाहू लागला. या तलावात 1 लाख 45 हजार दशलक्ष लिटर्स पाणी साठवण्याची क्षमता आहे. आठवडाभरात तुळसी, मोडक सागर, विहार व तानसा ही चार तलावं ओसंडून वाहू लागली. भातसा भरण्यासाठी 142 मीटर पाण्याच्या पातळीची आवश्यकता असून सध्याची पातळी 130 मीटर इतकी आहे.