Fri, Apr 19, 2019 08:40होमपेज › Mumbai-Thane-Raigad › तानसा पाईपलाईन सायकलिंग ट्रॅकची उभारणी होणार मार्चअखेर

तानसा पाईपलाईन सायकलिंग ट्रॅकची उभारणी होणार मार्चअखेर

Published On: Feb 15 2018 1:57AM | Last Updated: Feb 15 2018 1:40AMमुंबई : पुढारी वृत्तसेवा

मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेल्या तानसा पाईपलाईन शेजारी मुंबईकरांसाठी आरोग्यदायिनी ठरू पाहणार्‍या सायकलिंग ट्रॅकच्या बांधणीचे काम मार्चअखेर किंवा एप्रिलपासून सुरू होत आहे. प्रत्येकी दहा किलोमीटरच्या तीन टप्प्यात हा प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहे. ‘ग्रीन व्हील्स अलाँग ब्ल्यु लाईन’ या नावाने ओळखला जाणारा हा प्रकल्प 360 कोटींचा असून महापालिकेने पहिल्या टप्प्यासाठी 2018-19 च्या अंदाजपत्रकात 100 कोटींची तरतूद केली आहे. 

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून हा प्रकल्प राबवण्यात येणार असून  त्याचे 10-10 किमीचे तीन टप्पे निश्‍चित करण्यात आले आहेत. त्यामध्ये मुलुंड ते अंधेरी(पू.), भांडूप ते बांद्रा(पू.) आणि कुर्ला ते माहीम यांचा समावेश आहे. त्यापैकी मुलुंड ते अंधेरी(पू) या मार्गाचे काम मार्चअखेर किंवा एप्रिलमध्ये सुरू होत आहे. या मार्गात अडथळा ठरणारी अतिक्रमणे महापालिकेने नोव्हेंबर, डिसेंबरमध्येच तोडली होती. 

बाकी दोन्ही मार्गावरची अतिक्रमणे अजून हटवण्यात आली नसल्याने त्या मार्गाच्या बांधणीला थोडा वेळ लागेल, असे महापालिकेतील सूत्रांनी सांगितले. विशेषतः बांद्रा पूर्व ते सायन या परिसरातील अतिक्रमणे त्यामध्ये मोठा अडथळा आहेत. सायकलिंग ट्रकच्या बांधणीसाठी निविदा मागवण्यात आल्या असून महापालिका पातळीवर ठेकेदाराच्या निवडीचे काम सुरू आहे.  

याव्यतिरिक्त सदर प्रकल्पासाठी महापालिकेत चौथ्या टेंडरवर काम सुरू आहे. टॅ्रकसाठी माहिम खाडीवर पूल बांधावा लागणार असून त्यासाठी विशिष्ट अभियांत्रिकी तंत्रज्ञानाची गरज आहे. तसेच, संजय गांधी नॅशनल पार्कमधील प्राणी ट्रॅकवर येऊ नयेत, म्हणूनही तेथे विशिष्ट तांत्रिक कामाची गरज भासणार आहे. या वेगळ्या कामांसाठी हे चौथे टेंडर काढण्यात येणार आहे. 

महापालिकेने सायकलिंग ट्रॅकच्या दोन्ही बाजूची प्रत्येकी 10 मीटर परिसरातील अतिक्रमणे हटवली आहेत. टॅ्रकच्या या दोन्ही बाजूंच्या जागेमध्ये एका बाजूला सर्व्हिस रोड व दुसर्‍या बाजूला जॉगिंग ट्रॅक, सायकलिंग ट्रॅक/ट्रॉली ट्रॅक, त्याशिवाय पाईपलाईनच्या सर्व्हिसिंगसाठी मार्ग असले. महापालिकेच्या प्लॅननुसार या पूर्ण ट्रॅकवर 40 ठिकाणी प्रवेश व निर्गमन पॉईंट असणार आहेत.तसेच त्यांची 19 रेल्वे स्थानके, 7 मेट्रो स्थानके व 4 मोनो रेल्वेच्या स्थानकांशी कनेक्टिव्हीटी  असेल. 

पाईपलाईनशेजारी 16 हजारपेक्षा अधिक बांधकामे होती. उच्च न्यायालयाने 2009 मध्ये ती पाडण्याचे आदेश दिले आहेत. त्यापैकी काही पाडण्यात आली असून 27 ऑक्टोबर, 2017 रोजी काही बांधकामे हटविण्याचे काम सुरू असतानाच वांद्रे येथील गरीबनगरमध्ये आग लागली होती.