Fri, Feb 22, 2019 20:49होमपेज › Mumbai-Thane-Raigad › छेडछाडीला कंटाळून‘लॉ’ च्या विद्यार्थिनीचा आत्महत्येचा प्रयत्न

छेडछाडीला कंटाळून‘लॉ’ च्या विद्यार्थिनीचा आत्महत्येचा प्रयत्न

Published On: Jul 19 2018 1:38AM | Last Updated: Jul 19 2018 1:25AMभिवंडी : प्रतिनिधी 

शालेय जीवनातील ओळखीचा फायदा घेवून लॉ कॉलेजमध्ये शिक्षण घेणार्‍या एका तरुणीला विवाहित असलेल्या तरुणाने फिरायला येण्यासाठी तगादा लावला. एवढेच नाही, तर त्याने भर रस्त्याचे तिची छेडछाड केली. या प्रकाराला कंटाळून तरुणीने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना मांडवी येथे घडली. याप्रकरणी गणेशपुरी पोलिसांनी घटनेची नोंद केली असून तपास सुुरू केला आहे.

सदर तरुणी चर्नी रोड मुंबई येथील विधी महाविद्यालयात प्रथम वर्षामध्ये शिक्षण घेत आहे. मांडवी येथे राहणारा तरुण ईश्वर भांगरे (26) हा रिक्षाचालक असून त्याचे वर्षभरापूर्वी लग्न झाले आहे. तो यापूर्वी ती शिकत असलेल्या माध्यमिक शाळेत वरच्या वर्गात शिकत होता. त्यावेळी ओळखीच्या माध्यमातून त्याने तिचे फोटो मिळवले होते. त्या फोटोना एडिट करून तो तिला दाखवून सोबत फिरायला येण्याची जबरदस्ती करीत होता.मात्र त्याला विरोध केल्याने ईश्वरने तिचा हात व केस पकडून मारहाण केली. या छळाला कंटाळून तिने थायमेट नावाचे विषारी औषध पिवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सदर प्रकार तिच्या आईच्या लक्षात येताच शेजार्‍यांच्या मदतीने उपचारासाठी अंबाडी येथील जीवदानी हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. या घटनेची नोंद गणेशपुरी पोलिसांनी केली आहे. सदर गुन्हा पुढील तपासासाठी विरार पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या मांडवी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.