Sat, May 30, 2020 04:45होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कल्याणच्या वाणी विद्यालयात तामिळसक्‍ती!

कल्याणच्या वाणी विद्यालयात तामिळसक्‍ती!

Published On: Jun 22 2018 2:42AM | Last Updated: Jun 22 2018 2:24AMकल्याण : वार्ताहर

कल्याण पश्चिमेकडील खडकपाडा परिसरातील वाणी विद्यालयात विद्यार्थ्यांना तामिळ भाषेची सक्ती केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही बाब मनसेच्या पदाधिकार्‍यांना समजताच गुरुवारी पदाधिकार्‍यांनी शाळेवर धडक देत याबाबत शाळा प्रशासनाला जाब विचारला. पदाधिकार्‍यांचा आक्रमक पवित्रा पाहून शाळा प्रशासनाने मवाळ भूमिका घेत तामिळ भाषेची सक्‍ती मागे घेत ही भाषा पर्यायी  असून विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची सक्ती केली जाणार नसल्याचे लेखी दिले. 

खडकपाडा परिसरात प्रसिद्ध असलेले वाणी विद्यालय यंदा तामिळ भाषा सक्‍तीने चर्चेत आले. वेळापत्रकात तामिळ भाषा समाविष्ट करत ती शिकण्याची सक्तीच करण्यात आली. याविरूद्ध पालकांनी तक्रार करताच मनसेचे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर, माजी आमदार व मनसे सरचिटणीस प्रकाश भोईर, शहाराध्यक्ष कौस्तुभ देसाई, नगरसेविका कस्तुरी देसाई, शहर सचिव महेश मोरे, सचिन पोपलाइट, महिला शहर अध्यक्षा शीतल विखनकर, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष सचिन मोरे आदींनी वाणी विद्यालयात धडक दिली.

शिक्षण संस्थेचे संचालक सदस्य सुधाकर अय्यर यांची भेट घेत तामिळ सक्तीचा जाब विचारला. शिवाय ही सक्ती तात्काळ मागे घेण्याची मागणीही त्यांनी केली.  भांबावलेल्या शाळा प्रशासनाने आमची शाळा अल्पसंख्याक (मायनॉरिटी) असून तामिळ भाषेचा समावेश करणे बंधनकारक असल्याने या भाषेचा वेळापत्रकात समावेश केल्याचे सांगितले. मात्र, असे असले तरी या भाषेची सक्ती नाही, ज्याला शिकायची आहे तो शिकू शकतो असे सांगत सारवासारव केली. तसे लेखीही मनसे पदाधिकार्‍यांना दिले. त्यानंतरच हे आंदोलन मागे घेण्यात आले.