Thu, Apr 25, 2019 03:50होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई सीपीसाठी परमबीर सिंह, संजय बर्वेंची चर्चा?

मुंबई सीपीसाठी परमबीर सिंह, संजय बर्वेंची चर्चा?

Published On: Jun 29 2018 1:03AM | Last Updated: Jun 29 2018 1:00AMनवी मुंबई : राजेंद्र पाटील 

जूनअखेर राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथुर सेवानिवृत्त होत असून त्यांच्या जागी नवे पोलीस महासंचालक म्हणून सध्याचे मुंबई पोलीस आयुक्‍त दत्ता पडसलगीकर यांची वर्णी लागणार हे निश्‍चित झाले आहे. आता मुंबई पोलीस आयुक्त पदासाठी रस्सीखेच सुरू असून त्यामध्ये राज्य गुप्तवार्ता विभागाचे प्रमुख संजय बर्वे आणि ठाण्याचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची नावे आघाडीवर आहेत. 

मुंबई पोलीस आयुक्तपदासाठी सेवाज्येेष्ठता पाहिली जाते. पण ऐनवेळी सेवाज्येष्ठता डावलून पोलीस दलात ठसा उमटविणार्‍या अधिकार्‍यांनाही बसविले जाते, अशी काही उदाहरणेही आहेत.  सध्या आयुक्‍तपदासाठी  1985 बॅचचे सुबोध जयस्वाल, 1987 चे राज्य गुप्तावार्ता विभागाचे पोलीस महासंचाललक संजय बर्वे, 1988 चे ठाणे पोलीस आयुक्त परमबीर सिंह, 1988 बॅचच्याच पुणे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला हे चार आयपीएस अधिकारी पोलीस आयुक्तपदाच्या शर्यतीत आहेत. 

ठाण्याच्या पोलीस आयुक्तपदासाठी एसीबीचा पदभार सांभाळणारे अतिरिक्त पोलीस महासंचालक विवेक फणसळकर यांची नियुक्ती होऊ शकते. तर पुणे पोलीस आयुक्त रश्मी शुक्‍ला यांची वर्णी डीजी कार्यालयात किंवा एसीबी अतिरिक्त पोलीस महासंचालक पदावर लागू शकते. ठाण्याचे पोलीस आयुक्‍त परमबीर सिंह यापूर्वी एटीएसमध्ये होते. गेल्या तीन वर्षांत त्यांनी ठाण्यात चांगली छाप उमटवली आहे. मिरा- भाईंदर येथील कॉल सेंटरवर धाड, सोलापूर येथील गोडाऊनमधून अमलीपदार्थांचा कोट्यवधी रुपयांचा साठा हस्तगत, पेट्रोलपंपावर चिप्स वापरून पेट्रोल चोरीचे प्रकार उघडकीस आल्यानंतर या रॅकेटचा छडा लावणे, कुख्यात गुंड इक्बाल कासकरला अटक, परमार बिल्डर हत्या प्रकरण अशी गंभीर प्रकरणे परमबीर सिंह यांनी हाताळली आहेत. 

संजय बर्वे यांनी लाचलुचपत विभाग, मुंबई वाहतूक, लोहमार्ग अतिरिक्त महासंचालक, राज्य गुप्तवार्ता विभाग आणि अनेक ठिकाणी आयुक्त पदावर काम केले आहे. तेलगी स्टॅम्प घोटाळा प्रकरणाचे तपास प्रमुख म्हणूनही बर्वे ओळखले जातात.  तर सेवाज्येष्ठतेत आघाडीवर असलेले आयपीएस अधिकारी सुबोध जयस्वाल यांनी ही  तेलगी स्टॅम्प पेपर घोटाळ्याचे तपास अधिकारी म्हणून काम पाहिले आहे. 2006 मुंबई बॉम्बस्फोटाच्या तपास पथकात ते होते. मुंबई पोलीस दलात अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणूनही काम केले आहे. जयस्वाल हे रॉ मध्ये जाण्यासाठी उत्सुक असल्याची चर्चा आहे.