Wed, Apr 24, 2019 11:32होमपेज › Mumbai-Thane-Raigad › फ्लॅटसाठी घेतलेल्या दोन कोटींच्या सोन्याचा अपहार

फ्लॅटसाठी घेतलेल्या दोन कोटींच्या सोन्याचा अपहार

Published On: Jan 21 2018 2:50AM | Last Updated: Jan 21 2018 1:01AMमुंबई : प्रतिनिधी

सांताक्रुज येथे निर्माणाधीन इमारतीमध्ये दोन फ्लॅट देण्याचे आमिष दाखवून एका व्यापार्‍याकडून घेतलेल्या दोन कोटी रुपयांच्या सोन्याचा अपहार झाल्याची घटना अंधेरी परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी आंबोली पोलिसांनी चौघांविरुद्ध अपहार आणि फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे. या चौघांच्या अटकेसाठी आता पोलिसांनी शोध सुरु केला आहे. 

अंधेरीतील एस. व्ही रोडवरील गावठाण लेन क्रमांक चारमध्ये सत्तार अजीज मोदी हे व्यापारी त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. मार्च 2015 रोजी त्यांची व्यवसायाने बिल्डर असलेल्या चारही आरोपींशी ओळख झाली होती. या ओळखीनंतर ते चांगले मित्र झाले होते. या चौघांनी त्यांचे सांताक्रुज येथे शांती इमारतीचे बांधकाम सुरु असून या इमारतीमध्ये त्यांना तिसर्‍या मजल्यावर दोन फ्लॅट कमी किंमतीत देण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यांच्या या बतावणीला भुलून त्यांनी दोन फ्लॅटसाठी त्यांना मार्च 2015 ते जानेवारी 2018 या कालावधीत टप्प्याटप्प्याने दोन कोटी रुपयांचे सोने दिले होते. हा संपूर्ण व्यवहार अंधेरीतील जे. पी. रोडवरील सरकार कॉर्नर इमारतीमध्ये झाला होता. मात्र सोने घेतल्यानंतर त्यांनी दोन्ही फ्लॅटची कागदपत्रे बनवून दिली नाही तसेच तीन वर्षे उलटूनही फ्लॅटचा ताबा दिला नाही. या चौघांकडून आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सत्तार मोदी यांनी लेखी अर्जाद्वारे आंबोली पोलिसांत तक्रार केली होती.