Sat, Jun 06, 2020 18:44होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘ठाकरे’ चित्रपटाचे इंग्रजी पोस्टर मराठीत आणा

‘ठाकरे’ चित्रपटाचे इंग्रजी पोस्टर मराठीत आणा

Published On: Dec 24 2017 1:45AM | Last Updated: Dec 24 2017 1:45AM

बुकमार्क करा

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनचरित्रावर आधारित आणि सेना नेते संजय राऊत निर्मित ठाकरे या चित्रपटाचे टीजर लाँचिंग दिग्गजांच्या उपस्थितीत थाटात पार पडले. मात्र या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मुहूर्त आणि चित्रपटाच्या पोस्टरवर दिसणारी भाषा यांमुळे नवनव्या चर्चांना तोंड फुटू लागले आहे. 

 गेल्यावर्षी गश्मीर महाजनी अभिनीत देऊळबंद नावाचा एक मराठी सिनेमा प्रदर्शित झाला होता. प्रवीण तरडे यांनी तो दिग्दर्शित केला होता. त्याचे पोस्टर इंग्रजीत होते. ते मराठीत करण्याची सूचना शिवसेना नेत्यांनी तरडे यांना केली  आणि त्यानुसार तरडे यांनी पोस्टर मराठीत केले देखील. मात्र शिवसेनाप्रमुखांवरील ‘ठाकरे’ चित्रपटाचे पोस्टर इंग्रजी आणि उर्दूत झळकलेले पाहून तरडे यांनी आता सेनेलाच मराठीची आठवण करून दिली आहे. या पोस्टरबद्दल शिवसेना काय करणार असा सवाल तरडे यांनी सोशल मीडियावरून विचारला आहे. सेनेचे नेते आपले मराठी पाटी आंदोलन आठवून ठाकरे चित्रपटाचे पोस्टर कधी मराठीत करतात याबद्दल सोशल मीडियात मोठी उत्सुकता आहे. ठाकरे चित्रपटाचे पोस्टर मराठीत आणा, अशी मागणी करीत मनसेवर मराठी पाटी आंदोलन करण्याची वेळ आणू नका, असा सल्‍लाही दिला जात आहे. 

देशात लोकसभेच्या आणि राज्यात विधानसभेच्या निवडणुका 2019 साली होणार होणार असून, भाजपने मोदी इन 2019 असा हॅशटॅग आताच सुरू देखील केला आहे. त्यापाठोपाठ ठाकरे हा चित्रपटही 2019 सालीच प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे मोदी यांच्या आक्रमक प्रचाराला तोंड देण्यासाठी ठाकरे या सिनेमाचा शिवसेनेकडून पुरेपूर वापर केला जाणार असल्याची चर्चा  आहे. ठाकरे चित्रपटाचे पोस्टर आणि प्रदर्शनाचा मुहूर्त म्हणजेच ‘शिवसेना इन 2019’ असा सेनेचा हॅशटॅगच मानला जात आहे.