Tue, Jul 07, 2020 12:32होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ताडवाडी बीआयटी चाळीचा पुनर्विकास रद्द !

ताडवाडी बीआयटी चाळीचा पुनर्विकास रद्द !

Published On: May 06 2018 2:08AM | Last Updated: May 06 2018 2:03AMमुंबई : प्रतिनिधी 

तब्बल 13 वर्षे रखडलेला माझगाव ताडवाडी बीआयटी चाळीच्या पुनर्विकासाचा निर्णय पालिकेने मागे घेतला आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पासाठी नियुक्त करण्यात आलेल्या रबरवाला बिल्डरची हकालपट्टी करण्यात आली आहे. तशी नोटीस पालिकेचे सहाय्यक आयुक्त (मालमत्ता) पराग मसूरकर यांनी बिल्डरला बजावली आहे. या निर्णयाचे बीआयटी चाळीतील रहिवाशांनी जोरदार स्वागत केले आहे. 

माझगाव ताडवाडी येथील 16 बीआयटी चाळींचा पुनर्विकास करण्याचा निर्णय पालिकेने 13 वर्षांपूर्वी घेतला होता. तसा प्रस्तावही सुधार समितीत एकमताने मंजूर करण्यात आला. परंतु गेल्या 13 वर्षांत एकाही बिल्डिंगची नवी वीट रचण्यात आली नाही. उलट या 16 चाळींमध्ये राहणार्‍या 1 हजार 362 रहिवाशांपैकी 180 रहिवाशांना तेथेच संक्रमण शिबीर बांधून तर 220 रहिवाशांची रवानगी माहुल येथील पुनर्वसन प्रकल्पांतर्गत बांधलेल्या इमारतीत केली. त्यानंतर येथील पाच इमारती तोडण्यात आल्या. तर एका इमारतीची दुरुस्ती करून, अन्य इमारती अजूनही जैसे थे आहेत. 13 वर्षांपूर्वी या इमारतींच्या पुनर्विकासाला मंजुरी मिळाल्यामुळे पालिकेनेही येथील इमारतीची दुरुस्ती करण्यास बंद केले. त्यामुळे सध्या अस्तित्वात असलेल्या चाळींची दुरवस्था झाली आहे. चाळीच्या पुनर्विकासाकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे रहिवाशांनी बिल्डरची हक्कालपट्टी करण्याची मागणी केली होती. त्यामुळे रबरवाला बिल्डरने केलेल्या चालढकलपणाची पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी गंभीर दखल घेतली.

अखेर पालिकेच्या मालमत्ता विभागाचे सहाय्यक आयुक्त पराग मसूरकर यांनी बिल्डरला 3 मे रोजी नोटीस बजावून त्यांना दिलेले पुनर्विकासाचे काम काढून घेतले. एवढेच नाही तर, या बिल्डरची अन्य कामेही पालिकेने रद्द केली आहेत. त्यामुळे आता सुधार समितीत याचे शिक्कामोर्तब झाल्यानंतर नव्या बिल्डरची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे मालमत्ता विभागाकडून सांगण्यात आले. दरम्यान बीआयटी चाळींचा बिल्डरांमार्फत नाही तर, पालिकेने स्वत: विकास करून रहिवाशांना न्याय द्यावा, अशी मागणी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी केली आहे. दरम्यान या निर्णयाचे रहिवाशांनी स्वागत करत पेढे वाटले. 

Tags : Mumbai, mumbai news, Tadwadi, BIT Patch, redevelopment, canceled,