मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील संस्थाचालकांनी भरती केलेल्या शिक्षकांना टीईटी अनिवार्य करण्यात आली आहे. आता या शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण होण्यासाठी 2019ची परीक्षा ही शेवटची संधी असणार असल्याचे प्राथमिक शिक्षण संचालनालयाने स्पष्ट केले आहे. त्यानंतर अशा शिक्षकांची सेवा समाप्त होणार आहे.
अतिरिक्त शिक्षक समायोजन, पटपडताळणीच्या नावाखाली शासनाने मे 2012 पासून शिक्षकभरतीवर बंदी आणली व शिक्षकभरती पारदर्शक व्हावी व गुणवत्ताधारक शिक्षक मिळावेत, यासाठी शासनाने 2013 पासून टीईटी परीक्षा ही शिक्षकभरतीसाठी अनिवार्य केली आहे. यामुळे शिक्षक होण्यासाठी टीईटी पास असणे आवश्यक आहे. मात्र लाखो डी.टी.एडधारक हे भरतीच्या प्रतीक्षेत असूनही व भरतीवर बंदी असूनही अनुशेष पूर्ण करण्यासाठी विविध खासगी शैक्षणिक संस्थांच्या अनुदानित, अंशत: अनुदानित प्राथमिक शाळेत शिक्षक नियुक्त केले गेले. यातील अनेक शिक्षक हे टीईटी परीक्षा उत्तीर्ण नाहीत, असे शासनाच्या निदर्शनास आले आहे.
ही शेवटची संधी का?
अनुशेषच्या कारणाने संस्थाचालकांनी भरती केल्या गेलेल्या अपात्र शिक्षकांना ही पात्र होण्यासाठी शेवटची संधी असणार आहे. शासन निर्णयानुसार 30 जून 2016 नंतरच्या लगतच्या तीन टीईटी पास होणे आवश्यक आहे. यामध्ये जुलै 2017 व जुलै 2018 या दोन संधी झाल्या असून, आता 2019 ही टीईटी पात्र होण्याची शेवटची संधी या शिक्षकांजवळ आहे. अन्यथा त्यांच्यावर सेवासमाप्तीची कुर्हाड कोसळणार आहे.