Thu, Aug 22, 2019 08:51होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बहिणीच्या नवर्‍यावर तलवार-चाकूने हल्ला : दोघा भावांना बेड्या

बहिणीच्या नवर्‍यावर तलवार-चाकूने हल्ला : दोघा भावांना बेड्या

Published On: Jan 14 2018 1:53AM | Last Updated: Jan 14 2018 1:00AM

बुकमार्क करा
उल्हासनगर : वार्ताहर 

बहिणीने केलेल्या प्रेमविवाहाचा वचपा काढण्यासाठी दोघा भावांनीच  बहिणीच्या नवर्‍यावर तलवार-चाकूने हल्ला केल्याची घटना उल्हासनगरातील हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. या घटनेने जोरदार खळबळ माजली असून  दोन्ही भावांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

वीर तानाजी नगरातील गुरुद्वाराच्या मागे राहणारा आणि मजूर म्हणून काम करणारा 28 वर्षीय रवींद्र लाडगे याने सात-आठ वर्षांपूर्वी अंबरनाथमधील मुस्लीम तरुणीशी प्रेमविवाह केला होता. त्यावेळी या तरुणीचे भाऊ इरफान खान व सोनू खान लहान होते. या भावांनी विशी पार केल्यावर त्यांनी त्यांच्या दोन साथीदारांच्या मदतीने रवींद्र याला तानाजी नगरातील मशिदीजवळ गाठले आणि त्याच्यावर तलवार-चाकूने हल्ला केला.

या घटनेत गंभीर जखमी झालेल्या रवींद्र लाडगे यास शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले असून इरफान व सोनू या दोन भावांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. याप्रकरणातील दोघा अनोळखी व्यक्तींना लवकरच जेरबंद करण्यात येणार असल्याची माहिती हिललाईन ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक घनश्याम पलंगे यांनी दिली. या घटनेने उल्हासनगर तसेच परिसरात खळबळ माजली आहे.