मुंबई : प्रतिनिधी
प्रचंड चर्चा आणि कुतूहलाचा विषय झालेले मुंबईचे पहिल्यावहिल्या तीनपैकी एक तरंगते हॉटेल वांद्रे-वरळी सी लिंकजवळ बुडाल्याने शुक्रवारी एकच खळबळ उडाली. सुदैवाने वेळीच मदत पोहोचली आणि हॉटेल बोटीवरील कॅप्टनसह 15 कर्मचार्यांना स्थानिकांच्या मदतीने वाचविण्यात पोलिसांना यश आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्क हॉस्पिटॅलिटी कंपनीची हॉटेल बोट वांद्रे-वरळी सी लिंक जवळ समुद्रामध्ये उभी करण्यात आली होती. शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास ही बोट एका बाजूला कलंडत असल्याचे कॅप्टन इरफान शिरगावकर यांच्या लक्षात आले. त्याने तात्काळ सर्व यंत्रणांच्या नियंत्रण कक्षांना फोन केले. घटनास्थळी पोहचलेल्या वांद्रे पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने बोटीवरील कॅप्टनसह 15 कर्मचार्यांना सुखरुप बाहेर काढले.