होमपेज › Mumbai-Thane-Raigad › लाल फितीत अडकली वीरधवलची ‘फ्रीस्टाईल’

लाल फितीत अडकली वीरधवलची ‘फ्रीस्टाईल’

Published On: Aug 23 2018 1:28AM | Last Updated: Aug 23 2018 1:24AMमुंबई : पुढारी वृत्तसेवा

राष्ट्रीय सन्मान की रोजी-रोटी या फेर्‍यात अडकलेल्या भारतीय जलतरणपटू वीरधवल खाडेला आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये अखेर चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागल्याने खेळाडू व त्यांना मिळणार्‍या सुविधा हा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मला जर सरावाला वेळ व योग्य सुविधा मिळाल्या असत्या तर मी देशासाठी निश्‍चितच मेडल आणले असते, अशी खंतही त्याने व्यक्त केली आहे. 

आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये 50 मीटर फ्रीस्टाईल गटात वीरधवलचे पदक अवघ्या 0.01 सेंकदाने हुकले. या गटात चीनच्या यु हेक्झीन याला सुवर्ण, जपानच्या नकामुराला रौप्य, तर जपानच्याच नकाओला कांस्यपदक मिळाले. नकाओ याने 22.46 सेकंद इतका वेळ नोंदवला. तर, वीरधवलने 22.47 सेकंद इतका वेळ घेतल्याने त्यांच्या वेळेमध्ये अवघ्या 0.01 सेकंदाचा फरक पडला व देशाचे एक महत्त्वाचे पदकही हुकले. खेळामध्ये हार-जीत ही ठरलेलीच असते. पण, पदकाच्या समीप येऊनही अगदी सीमारेषेवर पदक हुकल्याने त्याचे गांभीर्य निश्‍चितच मोठे आहे.

याबाबत समोर आलेली माहिती ही सरकारी कारभार कसा एखाद्या बिन्नीच्या खेळाडूवर अन्याय करतो, याचे भेदक व जीवाला चुटपूट लावणारं उदाहरण आहे. वीरधवल हा सध्या राज्य शासनाच्या सेवेत असून तो गत दोन वर्षांपासून सिंधुदुर्गमध्ये संजय गांधी निराधार योजनेत तहसीलदार पदावर कार्यरत आहे. तो सध्या ज्या खात्यामध्ये काम करतो ते खाते सर्वसामान्य नागरिकांशी निगडीत आहे. तसेच, राज्य सरकारच्या कर्मचारी नियमावलीनुसार त्याला आपली नोकरी व्यवस्थित करणे आवश्यक असून तो ‘ट्रेनिंगसाठी दांडीही मारू शकत नाही. तरीही आपले शासकीय कर्तव्य सांभाळत आशियाई क्रीडा स्पर्धा तोंडावर असतानाही त्याने अवघ्या 18 महिन्यांपूर्वी सरावाला सुरुवात केली. यातील आणखी एक खास बाब म्हणजे, जवळ जवळ 10 वर्षानंतर तो अशा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत प्रथमच पुन्हा उतरला होता व पदकाच्या समीप पोहोचला होता.   

जलतरण हे वीरधवलचं ‘पॅसन’ असलं तरी सध्या तो कार्यरत असलेल्या मालवण शहरात स्विमिंग पूलच नाही. त्यामुळे मुळातच त्याच्या सरावावर कमालीच्या मर्यादा आल्या. बरे, व्यक्तिगत रक्कम मोजून सरावासाठी एखाद्या शहराचा आधार घ्यावा तर तेथील खर्च परवडण्यासारखा नसतो. त्याचबरोबर जलतरणसारख्या क्रीडा प्रकारातून खेळाडूंना काही कमाईही होत नाही. साहजिकच वीरधवलला आपली नोकरी सांभाळूनच या स्पर्धेची तयारी करावी लागत होती. तरीही तो पदकापर्यंत पोहोचला असल्याने सरकारी कारभारात कार्यरत असलेले खेळाडू व त्यांच्या सराव, सुविधांबाबत राज्य सरकारला पुनर्विचार करावा लागणार आहे.  

गोल्ड कोस्टमध्ये झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत मोठ्या प्रमाणात फंडिंग झालेले होते. त्यामुळे त्यांना सरावावर लक्ष केंद्रित करता आले होते. आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे नाव उज्ज्वल करायचे असेल तर अशा सरावांना व राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांत सातत्याने भाग घेण्याला पर्याय नसतो असेही त्याने सांगितले. तरीही त्याने जवळ जवळ 10 वर्षांनी अशा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत उतरून उत्कृष्ट कामगिरी करू शकल्याबद्दल व आपलेच राष्ट्रीय रेकॉर्ड मोडल्याने समाधान व्यक्त केले आहे.