Mon, May 20, 2019 22:04होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सुरुवात तुम्ही केली, पण शेवट मी करणार : धनंजय मुंडे 

सुरुवात तुम्ही केली, पण शेवट मी करणार : धनंजय मुंडे 

Published On: Mar 02 2018 12:49AM | Last Updated: Mar 02 2018 12:49AMमुंबई : प्रतिनिधी

विधिमंडळात जनसामान्यांचे प्रश्‍न मांडून त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न आपण सातत्याने करत आहोत. आजवर कुणावर वैयक्तीक आरोप केले नाहीत. सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी आज आपल्या मर्यादा ओलांडल्याचे सांगत कथित ऑडिओ क्‍लिप मागे भाजपाच असल्याचा संशय विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला. सुरुवात तुन्ही केली, पण शेवट मी करणार असे सांगत त्यांनी रोज एका मंत्र्याच्या भ्रष्टाचाराचे प्रकरण बाहेर काढण्याचा इशारा दिला. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या स्वीय सहाय्यकाची यासंदर्भातील सीडी सभापतींकडे देत चौकशीची मागणी केली. 

वाचा : न्यूज१८ - लोकमतच्या विरोधात विधान परिषदेत हक्‍कभंग दाखल

न्यूज 18 या वृत्तवाहिनीवर माझ्याबाबतीत बातमी दाखवली गेली. विधिमंडळात दलाली सुरू आहे असा आरोप केला गेला. ही गोष्ट विधिमंडळाची बदनामी करणारी असल्याचे सांगत या प्रकरणात कोणत्याही चौकशीस आपली तयारी असल्याचे मुंडे यांनी सांगितले. ही बातमी कोणी सोडली, कशी सोडली, ती व्यक्ती कोण कोणाला भेटली हे सर्व मला माहिती असल्याचे सांगत वृत्तवाहीनीवर ऐकविण्यात आलेल्या कथित प्रकरणाचा इन्कार केला. वसईतील त्या जमिनीच्या प्रकरणात कारवाई होण्यासाठी आजही पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. 

वाचा : ‘खंडणी सम्राट... हाय हाय’; भाजप आमदारांचा मुंडेंवर आरोप

सत्ताधार्‍यांनी मला हरवण्याचा प्रयत्न केला पण मी आज जिंकलोय. मी ज्या पद्धतीने सरकारविरोधात आवाज उठवतोय ते सत्ताधार्‍यांच्या डोळ्यात खुपतंय म्हणून असे आरोप केले जात आहे. मी जे काही करतो ते इमानदारीने करतो बदनामी करत नाही. जर इमानदारीने काम करूनही माझ्यासोबत असं राजकारण होत असेल तर यापुढे गप्प बसणार नाही. जनसामान्यांसाठी सुरु असलेल्या या लढाईमध्ये आज मी जिंकलो आहे आणि सरकार हरल्याचा टोला त्यांनी लगावला. 

भाऊ-बहिणीत युद्ध सुरू

कथित ऑडीओ क्‍लिप प्रकरणात मला बडतर्फ करा, पण महिला व बालविकास विभागातील भ्रष्टाचाराबाबत मी जे पुरावे दिले त्याची चौकशी करा. मी कुणाला घाबरत नाही असे सांगत धनंजय मुंडे यांनी मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक ग्रामविकास मंत्रालयाच्या 25-15 हेडखाली एका प्रकरणात 50 लाखाची मागणी करत असल्याची सीडी सभागृहात सादर  करत चौकशीची मागणी केली. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आपले स्वीय सहाय्यक प्रदिप कुलकर्णी यांच्या नावे सीडी व्हायरल झाली आहे. यासंदर्भात त्यांनी सकाळीच पोलीसात तक्रार आहे. विरोधी पक्षनेत्यांना ही सीडी कुणी दिली त्याची माहिती द्यावी, आपण स्वत: या प्रकरणात मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी करणार असल्याचे सांगितले.

वाचा : स्वीय सहायकाची बनावट ऑडिओ क्लिप व्हायरल, पंकजा मुंडे यांची बदनामी