Sat, Jan 19, 2019 02:14होमपेज › Mumbai-Thane-Raigad › एमपीएससी प्रवेशप्रक्रियेला स्थगिती

एमपीएससी प्रवेशप्रक्रियेला स्थगिती

Published On: Jan 18 2018 1:56AM | Last Updated: Jan 18 2018 1:45AM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी

महाराष्ट्र लोकसवा आयोगाच्या (एमपीएससी) प्रवेशप्रक्रियेला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. आरक्षित कोट्यातील उमेदवारांना खुल्या वर्गातून अर्ज दाखल केल्याच्या कारणावरून अपात्र ठरवले जात असल्याप्रकरणी दाखल याचिकेवर सुनावणी घेत उच्च न्यायालयाने ही प्रवेश प्रक्रिया स्थगित करण्याचा निर्णय घेतला. याबाबत अजय मुंडे यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती.

एमपीएससीद्वारे घेण्यात येणार्‍या परीक्षांमध्ये मागासवर्गीय कोट्यातल्या विद्यार्थ्याने गुणवत्तेच्या आधारावर खुल्या वर्गातून अर्ज केल्यास त्याला प्रवेश प्रक्रियेच्या एखाद्या टप्प्यावर खुल्या वर्गातून अर्ज केल्याच्या कारणावरून अपात्र ठरवले जाते. ही बाब या याचिकेतून उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आली. यावर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने राज्य सरकारला जाब विचारला आहे. गुणवत्तेच्या आधारावर जर एखादा परीक्षार्थी खुल्या वर्गातील जागेवर अर्ज दाखल करत असेल तर त्याला विरोध का, असा प्रश्‍न उच्च न्यायालयाने उपस्थित केला. यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने याआधी आदेश दिलेले असतानाही जर राज्य सरकार त्याची अंमलबजावणी करत नसेल, तर हा न्यायालयाच्या आदेशांचा अवमान असल्याचे उच्च न्यायालयाने यावेळी म्हटले. दरम्यान, राज्य सरकारला यासंदर्भात सविस्तर उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. 

या याचिकेवरील सुनावणी 1 फेब्रुवारीपर्यंत तहकूब करत पुढील सुनावणीपर्यंत एमपीएसची संपूर्ण प्रवेश प्रक्रिया स्थगित केली आहे. न्यायमूर्ती आर. एम. बोर्डे आणि न्यायमूर्ती राजेश केतकर यांच्या खंडपीठासमोर यावर सुनावणी सुरू आहे.