Thu, Apr 25, 2019 11:27होमपेज › Mumbai-Thane-Raigad › जीवरक्षक सरकारी औषधांची ४ राज्यांत बेकायदेशीर विक्री

जीवरक्षक सरकारी औषधांची ४ राज्यांत बेकायदेशीर विक्री

Published On: Sep 01 2018 2:08AM | Last Updated: Sep 01 2018 1:38AMठाणे : प्रतिनिधी 

जीवरक्षक म्हणून वापर करण्यात येणार्‍या आणि  महाग असलेल्या ह्युमन नॉर्मल इम्युनोग्लोबीन फॉर इंट्राव्हेनस अ‍ॅडमिनीस्ट्रेशन (आय. पी 5 %) या औषधाची गैरमार्गाने महाराष्ट्रासह 4 राज्यात विक्री होत असल्याचे औषध विभागाच्या निदर्शनास आले आहे. याप्रकरणी  महाराष्ट्रासह, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, पश्‍चिम बंगाल या 5 राज्यात सध्या तपास सुरू असून या मागे मोठे रॅकेट असल्याचा औषध विभागाला संशय आहे. सध्या या प्रकरणात भाईंदर येथील एका औषध विक्रेत्यासह 4 राज्यांतील 12 औषध विक्रेत्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ह्युमन नॉर्मल इम्युनोग्लोबीन फॉर इंट्राव्हेनस अ‍ॅडमिनीस्ट्रेशन (आय. पी 5 %) या औषधाचे उत्पादन व विक्री नवी मुंबईतील रबाळे येथील रिलांयन्स लाईफ सायंसेस या कंपनीत केली जाते. या औषध बाटलीची किंमत 14 हजार 697 रुपये आहे. हे औषध प्रामुख्याने रुग्णाची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी वापरले जाते. रिलांयन्स लाईफ सायंसेस या कंपनीने सदरच्या औषधांची विक्री मागणीनुसार राजस्थान सरकारला केली होती. मात्र सरकारला विकलेल्या या औषधांची खुल्या बाजारात विक्री होत असल्याचा संशय कंपनीच्या आधिकार्‍यांनी अन्न व औषध विभागाकडे व्यक्त केला होता. त्यानुसार औषध विभागाने अन्न व औषध  प्रशासनाच्या आयुक्त पल्लवी दराडे, सह आयुक्त विराज पौनिकर व सह आयुक्त सु. स. मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली 5 पथके तयार केली. 

या पथकांनी ठाणे जिल्ह्यातील भाईंदर येथील मे. मेडीकॉन लाईफ केअर या औषध दुकानत चौकशी केली असता, त्यांना या औषधाची विक्री होत असल्याचे निदर्शनास आले. पथकाला आढळून आलेली औषधेही राजस्थान सरकारला वितरित करण्यात आली होती, मात्र भाईंदरच्या सदर विक्रेत्याकडे सापडलेल्या औषधावर राजस्थान सरकारसाठी, खासगी विक्रीसाठी नाही, असे स्पष्ट असतानाही, या औषधाची बाजारात विक्री होत असल्याचे पथकाला आढळून आले. तपासणीअंती त्याने ही औषधे मे. मेडिकेड ड्रग हाऊस (इंदौर), मे. चारू फार्मसी (कलकत्ता) यांच्याकडून खरेदी केली असल्याची माहिती मिळाली.  इंदौर,  कोलकात्ता येथेही चौकशी केल्यानंतर मे. मेडीकॉन लाईफ केअर यांनी हे औषध ठाणे, सुरत व अहमदाबाद येथील विकेत्यांना विकल्याची माहितीही या तपासात पुढे आली.