Thu, Aug 22, 2019 15:32होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सर्जिकल स्ट्राईक हा राजकारणाचा विषय नाही : निर्मला सीतारामन

सर्जिकल स्ट्राईक हा राजकारणाचा विषय नाही : निर्मला सीतारामन

Published On: Apr 26 2019 1:48AM | Last Updated: Apr 26 2019 1:51AM
मुंबई : विशेष प्रतिनिधी 

2016 साली भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मिरात सर्जिकल स्ट्राईक करून दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. तर पुलवामा हल्ल्यानंतर थेट पाकिस्तानात घुसून एअर स्ट्राईक केला. मात्र, जे पाकिस्तानला हवे आहे ते प्रश्‍न विरोधक उपस्थित करीत आहेत हे दुर्दैवी आहे. एअर स्ट्राईक हा आमच्यासाठी राजकारणाचा नाहीतर राजकीय इच्छाशक्तीचा विषय असल्याचे प्रत्युत्तर संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिले. गुरुवारी त्या प्रदेश भाजप कार्यालयातील पत्रकार परिषदेत बोलत होत्या. 

एअर स्ट्राईकबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या सभांमधून प्रश्‍न उपस्थित करत आहेत. त्यावर बोलताना सीतारामन म्हणाल्या, सैनिकांनी केलेल्या कामगिरीवर प्रश्‍नचिन्ह लावणे चुकीचे आहे. हा विषय राजकारणाचा होऊ शकत नाही. पाकिस्तान जी भाषा बोलत आहे तीच भाषा विरोधकही बोलतात याचे आश्‍चर्य वाटते. 

मुंबईतील 26/11 दहशतवादी हल्ल्यानंतर जर तत्कालीन यूपीए सरकारने अशी कठोर कारवाई केली असती तर पुन्हा असे दहशतवादी हल्ले झाले नसते.  दहशतवादाच्या विरोधातले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे झीरो टॉलरन्स धोरण आणि राजकीय इच्छाशक्ती महत्वाची असून त्यामुळेच जम्मू-काश्मीरमधला काही भाग सोडला तर देशातल्या इतर कोणत्याही भागात गेल्या पाच वर्षात दहशतवादी हल्ल्याच्या घटना घडलेल्या नाहीत, असेही सीतारामन म्हणाल्या. 

काँग्रेस जाहीरनाम्यात लष्कराला अधिकार देणारा आफस्पा कायदा हटवण्याविषयी आश्वासन दिले आहे. त्याविषयी निर्मला सीतारामन म्हणाल्या की, आफस्पाशिवाय लष्कराला जम्मू-काश्मीरमध्ये काम करणे अशक्य आहे. आफस्पा हटवण्याआधी जम्मू-काश्मीरमधल्या स्थानिक पातळीवर राज्य आणि केंद्र सरकारला खप मोठ्या प्रमाणावर काम करावे लागेल. त्यामुळे आफस्पा कायदा रद्द करणे अशक्य आहे. राफेल खरेदी व्यवहार प्रकरणी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना त्या म्हणाल्या की, डिसेंबर 2018 मध्ये सुप्रीम कोर्टाने या व्यवहाराविषयी निकाल दिला आहे. कॅग या संस्थेनेसुध्दा आपला अहवाल सादर केला आहे. मात्र तरीही काँग्रेस पक्ष या संस्थावर अविश्वास दाखवत आहे.