होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सुरेश पुजारीच्या साथीदाराचा आत्महत्येचा प्रयत्न

सुरेश पुजारीच्या साथीदाराचा आत्महत्येचा प्रयत्न

Published On: Jan 21 2018 2:50AM | Last Updated: Jan 21 2018 1:03AMमुंबई : प्रतिनिधी

दक्षिण मुंबईतील एका व्यावसायिकाला 50 लाख रुपयांच्या खंडणीसाठी धमकी दिल्याप्रकरणी शुक्रवारी अटक केलेल्या सुरेश पुजारी टोळीच्या संकेत उदय दळवी ऊर्फ सॅण्डी या आरोपीने गळ्यावर काचेने दुखापत करुन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. त्याच्या गळ्यावरील दुखापत गंभीर असल्याने त्याच्यावर शासकीय हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे. या प्रकाराने खंडणीविरोधी पथकाच्या अधिकार्‍यांमध्ये एकच खळबळ उडाली. दरम्यान या घटनेची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिल्याचे बोलले जाते. 

उल्हासनगरच्या एका कॅमेरा विक्री करणार्‍या व्यावसायिकाला सुरेश पुजारीकडून 50 लाख रुपयांच्या खंडणीसाठी धमकी आली होती. याप्रकरणी गुन्हा नोंद होताच खंडणीविरोधी पथकाने त्याचा तपास हाती घेत काही तासांत पाच आरोपींना वेगवेगळ्या परिसरातून अटक केली होती. त्यात संकेत दळवीसह हरिश कृष्णपा कोटीयन, अनिकेत किशोर ठाकूर, नूरमोहम्मद दिलमोहम्मद खान ऊर्फ कल्लू आणि प्रथमेश शिवराम कदम यांचा समावेश होता. मात्र अटकेनंतर संकेतने काचेच्या तुकड्याने गळ्यावर वार करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यात तो गंभीररीत्या जखमी झाल्याने त्याला तातडीने जवळच्या शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्याची दुखापत गंभीर असल्याने त्याच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु आहे. 

संकेत दळवी हा मूळचा रत्नागिरीचा रहिवाशी असून सध्या तो डोंबिवली परिसरात राहतो. त्याने  आत्महत्येचा प्रयत्न केल्याने त्याच्या नातेवाइकांना कळविण्यात आले आहे. त्याच्यावर उपचार सुरु असल्याने त्याला शनिवारी येथील लोकल कोर्टात तसेच पत्रकार परिषदेत हजर करता आले नाही. केवळ चारच आरोपींना पत्रकार परिषदेत हजर करण्यात आले होते, मात्र संकेतविषयी काहीही बोलण्यास पोलिसांनी नकार दिला. मात्र कोर्टात संकेतविषयी पोलिसांना सविस्तर माहिती तसेच त्याची वैद्यकीय उपचाराची कागदपत्रे सादर करण्यात आली होती.