Sun, Aug 25, 2019 07:58होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई विद्यापीठाच्या कुलसचिव पदाचा अतिरिक्त कार्यभार सुनिल भिरूड यांच्याकडे

मुंबई विद्यापीठाच्या कुलसचिव पदाचा अतिरिक्त कार्यभार सुनिल भिरूड यांच्याकडे

Published On: Sep 07 2018 4:25PM | Last Updated: Sep 07 2018 4:25PMमुंबई : प्रतिनिधी

मुंबई विद्यापीठाच्या कुलसचिव पदाचा अतिरिक्त कार्यभार प्रो. सुनिल भिरूड यांच्याकडे आज सोपविण्यात आला. वीरमाता जिजाबाई टेक्नोलॉजिकल इन्स्टीट्यूट माटुंगा येथील संगणक आणि माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्राध्यापक आणि कुलसचिव म्हणून कार्यरत असणाऱ्या प्रो. भिरूड यांच्याकडे आज मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रोफेसर सुहास पेडणेकर यांनी मुंबई विद्यापीठाच्या कुलसचिव पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविला. प्रो. भिरूड यांच्याकडे हा अतिरिक्त कार्यभार पुढील सहा महिन्याकरिता किंवा पुढील आदेश निर्गमित होईपर्यंत किंवा सरळसेवेने पद भरेपर्यंत यापैकी जे आधी घडेल त्या कालावधीपर्यंत असेल.

प्रो. सुनिल भिरूड यांनी अभियांत्रिकी शाखेत एम. ई आणि पीएचडी केली असून, त्यांचा २९ वर्षांचा शैक्षणिक आणि ५ वर्षांचा प्रशासकिय अनुभव आहे. रिसर्च आणि डेव्हलपमेंट क्षेत्रात त्यांनी एक वर्षांचे महत्वाचे योगदान दिले असून, २०१० ते २०१५ पर्यंत एआयसीटी नवी दिल्ली येथे सल्लागार म्हणून योगदान दिले आहे. एआयसीटी मधील ई-गव्हर्नन्स सिस्टम, लीगल सेल, व्हिजिलेंस ऑफिसर आणि डायरेक्टर पब्लिक ग्रीव्हंस सेल या पदावर त्यांनी काम केले आहे. प्रो. सुनिल भिरुड यांनी आजपासून कुलसचिव पदाचा अतिरिक्त कार्यभार स्विकारला आहे.