होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पुण्यातील सनबर्न वादाच्या भोवर्‍यात

पुण्यातील सनबर्न वादाच्या भोवर्‍यात

Published On: Dec 19 2017 2:03AM | Last Updated: Dec 19 2017 1:04AM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

नववर्षाच्या स्वागतासाठी आयोजित केलेल्या पुण्यातील सनबर्न फेस्टिवलला लाखोच्या संख्येने होणार्‍या गर्दीत किशोरवयीन मुलामुलींना मद्यापासून कसे रोखले जाणार, या कार्यक्रमाच्या आयोजनाला अन्य परवानग्या मिळाल्या आहेत काय, अशा प्रश्‍नांबरोबरच शेजारच्या राज्यात करचुकवेगिरीचे आरोप होत असताना राज्य सरकार आयोजकांना परवानगी कशी काय देऊ शकते, असा जाब विचारत उच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि आयोजकांना बुधवार 20 डिसेंबरपर्यत सविस्तर माहिती सादर करण्याचे निर्देश दिले.

पुण्याजवळील लवाळे गावातील ऑक्सफर्ड गोल्फ रिसॉर्टमध्ये 28 डिसेंबर ते 1 जानेवारी दरम्यान आयोजीत करण्यात आलेल्या 11 व्या सनबर्न फेस्टिवल विरोधात ग्रामस्थांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती शंतनू केमकर आणि न्यायमूर्ती राजेश केतकर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी याचिकाकर्त्यांच्यावतीने बाजू मांडताना या फेस्टिवलमध्ये संगीताशी संबंधित या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कलाकार आपली कला सादर करतात. या कार्यक्रमाला दरवर्षी लाखोंच्या संख्येने चाहते हजेरी लावतात. डिजेच्या तालावर धुंद होऊन जल्लोष साजरा करत नववर्षाच्या स्वागतासाठी तरूणाई इथे मोठ्या संख्येने हजेरी लावते. त्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात गैरकृत्य होण्याची शक्यता असल्याचा आरोप केला. याची दखल न्यायालयाने घेऊन राज्य सरकार आणि आयोजकांना सविस्तर माहिती देण्याचे निर्देश दिले.

संगीतातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कलाकार या कार्यक्रमात सहभागी होतात. तसेच आयोजकांना परवानगी देण्यात आलेल्या जागेपासून मर्यादित अंतरावर शाळा, मंदिर किंवा प्रार्थनास्थळ नसल्यानेच या कार्यक्रमाला परवानगी देताना लाऊडस्पीकच्या वापराला वेळेची मर्यादा घालून देण्यात आली आहे. 31 डिसेबर रोजी रात्री 12 पयर्ंतचा अपवाद वगळता अन्य दिवशी रात्री 10 पर्यंत लाऊडस्पिकर लावण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच मद्यविक्रीचा परवाना प्राप्त झाल्यानंतरच आयोजनाच्या ठिकाणी मद्यविक्रीची परवानगी दिली जाईल. अल्पवयीन मुलांना जर मद्यविक्री होत असल्याचे निर्दशनास आले तर आयोजकांवर तात्काळ कारवाई केली जाईल, अशी भूमिका राज्य सरकारच्यावतीने सरकारी वकील अ‍ॅड. अभिनंदन यांनी यांनी मांडली.