Mon, Aug 19, 2019 05:21होमपेज › Mumbai-Thane-Raigad › उन्हाळी आजार वाढले, डॉक्टरांकडे रांगा 

उन्हाळी आजार वाढले, डॉक्टरांकडे रांगा 

Published On: May 16 2018 1:43AM | Last Updated: May 16 2018 1:27AMमुंबई : संजय गडदे

मुंबईचे तापमान वाढू लागल्यावर खोकला, चक्कर, डोकेदुखी, लो ब्लडप्रेशर, डिहायड्रेशन आणि पोटाच्या विकाराच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. वाढती उष्णता त्यामुळे बाहेरील खाद्यपदार्थ तथा थंड पेये घेतल्याने त्याचा थेट परिणाम पित्ताशय, मूतखडा अशा समस्या घेऊन रुग्णांची संख्या अधिक असल्याचे आढळून येत आहे. 

मुंबईत सकाळी आकाशात मळभ आलेली दिसते तर दहा वाजल्यापासूनच उन्हाचा कडाका वाढतो. अशा विचित्र वातावरणाचा मुंबईकरांच्या तब्येतीवर विपरीत परिणाम होऊ लागला आहे. शिवाय जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केल्याप्रमाणे मुंबईत गेल्या काही वर्षांपासून हवेतील प्रदूषणही प्रचंड वाढले आहे. त्यामुळे खोकल्याचे पेशंट प्रचंड प्रमाणात वाढल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले आहे. पूर्वी सर्दी-पडसे-खोकला असे आजार ठरावीक ऋतूमध्ये दिसून येतात; पण आता खासकरून खोकल्याचे पेशंट कायम आढळून येतात.

उन्हाळ्याचा कडाका वाढल्यावर थंडगार सरबत, बर्फाचे गोळे, कुल्फी, प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये विक्रीला ठेवलेले विविध प्रकारचे ज्यूस, स्टेशनच्या बाहेर विकले लिंबू सरबत किंवा संत्र्याचे सरबतावर ताव मारतात. पण त्यासाठी कोणते पाणी वापरतात याची आपल्याला कल्पनाही नसते. अनेकदा रस्त्यावर लिंबू सरबत विक्री करणारे नामांकित कंपन्यांचे बाटलीबंद पाणी वापरत असल्याचा फलक लावतात; पण अनेकदा तेही हानीकारण असते.दूषित पाण्यामुळे कावीळ झाल्याच्या तक्रारी वाढल्याचे झेन रुग्णालयाचे डॉ. रॉय पाटणकर यांनी सांगितले.

गेल्या काही दिवसांमध्ये तरुणांमध्ये पोटाचे विकार, मूतखडा तथा किडनीचे प्रमाण अधिक वाढत आहेत. खाण्यापिण्याच्या बदललेल्या जीवनशैलीमुळे अनेक तरुणांना मूळव्याध तथा अ‍ॅसिडिटीसारखे आजार सर्रास दिसून येत आहेत. गेल्या 2 महिन्यांत पोटाच्या समस्या घेऊन येणार्‍या रुग्णांचा आकडा जवळपास 100-150 आसपास असून यात तरुणांचा समावेश आहे.