Wed, Mar 20, 2019 22:55होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सुकाणू समिती 1 मार्चपासून छेडणार असहकार आंदोलन

सुकाणू समिती 1 मार्चपासून छेडणार असहकार आंदोलन

Published On: Feb 03 2018 2:42AM | Last Updated: Feb 03 2018 2:36AMमुंबई : विशेष प्रतिनिधी 

गेल्या वर्षीच्या ऐतिहासिक शेतकरी संपानंतर येत्या 1 मार्चपासून शेतकरी सुकाणू समितीने असहकार आंदोलनाचा इशारा दिला आहे. 1 मार्चपासून विविध प्रश्‍नांसाठी कर, कर्ज व वीज बिल न भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावर तोडगा काढण्यासाठी समितीने शुक्रवारी मुख्यमंत्री देवेेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यावर बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. 

शेतकरी सुकाणू समितीचे निमंत्रक डॉ. अजित नवले, शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील आदींनी ही भेट घेतली. या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना नवले म्हणाले, राज्य सरकार कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव आदी मुद्द्यांवर गंभीर नाही. त्यामुळे असहकार आंदोलन पुकारले जाणार आहे. कर, कर्ज आणि वीजबिल भरले जाणार नाही.  

सरकारने दिलेली कर्जमाफी फसवी आहेत. अनेक गावांत पाच ते सहा शेतकर्‍यांनाच तुटपुंज्या कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. तर सरकारने 89 लाख शेतकर्‍यांना कर्जमाफी मिळाल्याचा दावा खोटा असल्याचे रघुनाथ पाटील म्हणाले.शेतकर्‍यांना कर्जमाफीपासून वंचित ठेवण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप पाटील यांनी केला. शेतकर्‍यांच्या प्रश्‍नाबाबत स्वतंत्र बैठक आयोजित करण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहितीही रघुनाथ पाटील यांनी दिली.

राज्य सरकार वारंवार आश्‍वासने देऊनही शेतकर्‍यांचे प्रश्‍न सोडवित नाही. प्रश्‍न चिघळत ठेवण्याचे सरकारचे धोरण आहे. त्यावर सरकारने महिनाभरात निर्णय घेतला नाही तर सरकारला मोठी राजकीय किंमत मोजावी लागले, असा इशाराही पाटील यांनी दिला.