Fri, Apr 26, 2019 17:18होमपेज › Mumbai-Thane-Raigad › विरोधकांकडून आत्महत्यांचे राजकारण : मुख्यमंत्री

विरोधकांकडून आत्महत्यांचे राजकारण : मुख्यमंत्री

Published On: Feb 26 2018 1:44AM | Last Updated: Feb 26 2018 1:44AMमुंबई : विशेष प्रतिनिधी

सत्ता गेल्यामुळे विरोधी पक्षात आलेली निराशा अजूनही संपलेली नाही. विरोधकांकडे कोणतेही मुद्दे नसल्याने कसेही करून सत्ता हस्तगत करण्यासाठी ते आत्महत्यांचेदेखील राजकारण करू लागले आहेत. आजच्या एवढा हताश विरोधी पक्ष कधीही पाहिला नाही, असा पलटवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची मळमळ स्पष्ट दिसत असली तरी त्यांना अजून दीर्घकाळ विरोधी पक्षातच बसावे लागणार असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे. या अधिवेेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला, त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, विरोधकांनी पाच वर्षांतील बहिष्काराची पत्रे आधीच टाईप करून ठेवली आहेत. त्या मालिकेतील आणखी एक पत्र आम्हाला मिळाले. पंधरा वर्षांमध्ये त्यांना जे करता आले नाही, ते आम्ही केवळ तीन-चार वर्षांत करू आणि त्यांनी जे पंधरा वर्षांत करून ठेवले आहे तेही निस्तरावे, असा दुर्दैम्य आशावाद विरोधकांमध्ये आहे. सत्ता गेल्यामुळे त्यांना निराशेने ग्रासले आहे. त्यामुळे कसेही करून सत्तेवर येण्यासाठी मिळेल त्या मुद्द्याचा फायदा घेण्याची त्यांची धडपड सुरू आहे. अगदी आत्महत्येसारख्या मुद्द्यांचेही ते राजकारण करू लागले आहेत, हे दुर्दैैवी असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

मंत्रालय परिसरात आत्महत्या होणे ही गंभीरच बाब आहे. सरकार त्याकडे गांभीर्याने पहात आहे. मात्र, या आत्महत्यांना कोणी गौरवान्वित करू नये. धर्मा पाटील यांच्या जमिनीची भूसंपादन प्रक्रिया ही पूर्णपणे मागील सरकारच्या काळात पार पडली. उलट राज्य सरकारने त्यांच्या आत्महत्येपूर्वीच मार्ग काढण्यासाठी सानुग्रह अनुदान दिले. दुसरी जी आत्महत्या झाली, तो व्यक्‍ती हा निर्घृण खून केल्याने शिक्षा झालेला होता. त्याची शिक्षा कमी करण्याची मागणी होती. त्यामुळे अशा आत्महत्यांचे उद्दात्तीकरण करू नका, असा सल्लाही त्यांनी विरोधकांना दिला. यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, उद्योगमंत्री सुभाष देसाई, सार्वजनिक बांधकाममंत्री (उपक्रम) एकनाथ शिंदे, परिवहनमंत्री दिवाकर रावते, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आदी मंत्री उपस्थित होते.