Thu, Jul 18, 2019 08:04होमपेज › Mumbai-Thane-Raigad › साखर साम्राज्याचा पायाच खिळीखिळा

साखर साम्राज्याचा पायाच खिळीखिळा

Published On: Jun 03 2018 1:35AM | Last Updated: Jun 03 2018 1:30AMमुंबई : चंद्रशेखर माताडे

साखर उद्योगाने ऊस उत्पादक शेतकर्‍यांने पाच हजार कोटी रुपये थकविल्याने बाजारातही थंड मामला आहे. ऊस उत्पादक शेतकर्‍यांने साखर कारखान्याला उसाचा पुरवठा केल्यानंतर त्याला 14 दिवसांत एफआरपी मिळाली पाहिजे, असा कायदेशीर दंडक आहे. मात्र, ज्याच्या आधारावर ही सगळी बिले चुकती करायची त्यालाच जर बाजारात किंमत नसेल तर शेतकर्‍यांना ती कोठून द्यायची असा मामला आहे. 

दरवर्षीप्रमाणे गळीत हंगाम सुरू होताना दराची चर्चा झाली व पश्‍चिम महाराष्ट्रात एफआरपी वर दोनशे रुपये देण्याचा उभयमान्य तोडगा निघाला. मात्र, त्यावेळी बाजारात असलेले साखरेचे भाव पुढे राहिले नाहीत व त्याहीपलीकडे जाऊन कोसळलेल्या भावातही साखरेला ग्राहकच नसल्याने सगळे आर्थिक गणितच बिघडले. दराची गाडी घसरली मागणीपेक्षा जास्त उत्पादन व वाढलेल्या उत्पादनाला गिर्‍हाईक नाही या दुष्टचक्रात साखरेच्या साम्राज्याचा पाया खिळखिळा झाला.गेल्या वर्षी 88 सहकारी व 62 खासगी अशा एकूण 150 साखर कारखान्यांनी गळीत हंगाम घेतला होता. तर यंदाच्या गळीत हंगामात तब्बल 187 साखर कारखाने सुरू होते. त्यामध्ये 101 सहकारी तर 86 खासगी कारखान्यांचा समावेश होता. गेल्या वर्षी 373 लाख मे. टन उसाचे उत्पादन झाले तर यावर्षी हे उत्पादन जवळजवळ तिपटीने वाढून ते 951 लाख मे. टनांवर गेले. गेल्या हंगामात 42 लाख टन तर यावर्षीच्या गळीत हंगामात 107 लाख मे. टन एवढी प्रचंड साखर तयार झाली आणि साखर उद्योगाची सारी गाडीच रूळावरून घसरली.

राज्याने बाजारपेठ गमावली राज्याची मागणी ही 24 लाख मे. टन साखरेची आहे. उर्वरित सगळी साखर ही मध्य प्रदेश, गुजरात व ईशान्येकडील राज्यात पाठविली जाते. मात्र, यंदा उत्तर प्रदेशच्या साखरेने ही सगळी बाजारपेठ काबीज केली व महाराष्ट्राची साखर उघड्यावर पडली. 3 हजार 600 रुपये असणारा दर हा 2 हजार 450 रुपयांपर्यंत घसरल्याने साखर उद्योगाची घसरगुंडी सुरू झाली ती थांबण्याचे नाव घ्यायला तयार नाही. या घसरलेल्या दरातही साखरेला मागणी नसल्याने साखरेचे करायचे काय? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. बँकांचा हातही आखडता त्याचवेळी बँकानीही हात आखडता घेतला. बाजारात घसरणार्‍या दरांबरोबरच साखरेचे मूल्यांकनही घटत गेले  व साखर उद्योग आर्थिक गाळात रुतत गेला.

किमान 10 हजार कोटी थकले केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा खात्याचे मंत्री रामविलास पासवान यांनी देशाच्या आर्थिक राजधानी मुबंईत येऊन साखर उद्योगाचे चित्र मांडताना देशात ऊस उत्पादकांचे 19 हजार कोटी तर राज्यात 5 हजार कोटी थकीत असल्याची कबुली दिली. मंत्र्यांच्या या निवेदनाने शेतकरी संघटनांच्या थकीत आकडेवारीला बळ मिळाले त्याचबरोबर या व्यवसायोच भीषण वास्तव समोर आले.

केवळ ऊस उत्पादकांचे 5 हजार कोटी रुपये थकले आहेत ते दिसते, पण त्याचबरोबर साखर कारखान्यांचे माल पुरवठादार, वाहतूकदार एवढेच नव्हे तर काही ठिकाणी कर्मचार्‍यांचेही पगार थकले आहेत. ही थकीत रक्कमही तेवढ्याच घरात जाते म्हणजेच साखर उद्योग अडचणीत आल्यामुळे 10 हजार कोटी रुपये थकले आहेत. या थकीत रकमेने बाजाराची चाके मात्र थांबली आहेत. ऊस पट्ट्यातील ग्रामीण भागात सन्‍नाटा आहे. जेथे दुधाचे पैसे मिळतात तेथे थोडी बर्‍यापैकी परिस्थिती होती. पण दूधही बिघडले व साखरही बिघडली त्यामुळे ग्रामीण भागात पसरलेला सन्‍नाटा जीवघेणा आहे.

ग्रामीण भागात खिन्‍नता मुलामुलींचे शिक्षण, त्यांची लग्ने यासह दैनंदिन जीवनावर झालेला परिणाम हा भयावह आहे. फी भरण्यासाठी पैसे नसल्याने शिक्षणावर झालेला परिणाम हा पुढच्या पिढीचे कायमचे नुकसान करणारा ठरू शकतो. त्याचबरोबर ऊसाचे नियमित पैसे येण्याचे कायमचे बसलेले गणित एकदमच बिघडल्याने आलेली खिन्‍नताही जीवघेणी आहे. यातून उद्याच्या काळात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍नही तयार होऊ शकतो.राजकीय पक्षाच्या पलीकडे सगळ्यांनी एकत्र येऊन या प्रश्‍नाकडे पहायला हवे, त्यावर मार्ग काढायला हवा. साखरेबरोबर दुधाचा प्रश्‍नही तयार झाला आहे. गावोगावी असलेले बेरोजगारांचे तांडे वाढत आहेत. त्यातन नेहमीच्या चक्राला खीळ बसल्याने उद्याच्या काळात यातून काय निर्माण होईल याचा अंदाज बांधणे अवघड बनले आहे.