Thu, Jan 17, 2019 08:42होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मराठा आरक्षणाचा निर्णय त्वरित करावा

मराठा आरक्षणाचा निर्णय त्वरित करावा

Published On: Jul 26 2018 1:35AM | Last Updated: Jul 26 2018 12:47AMमुंबई : विशेष प्रतिनिधी

मराठा समाजाला आता आरक्षणापासून फार काळ दूर ठेवता येणार नाही. सरकारने आरक्षणाबाबत लवकरात लवकर तोडगा काढावा, अशी विनंती खा. नारायण राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. या भेटीनंतर येत्या दोन तीन दिवसात हालचाली होतील आणि या विषयावर पडदा पडेल, असे राणे यांनी सांगितले. 

मराठा समाजाचे तरुण कार्यकर्ते आरक्षण मिळाले पाहिजे म्हणून आंदोलनात उतरले आहेत. आंदोलन चिघळू नये म्हणून त्यात हस्तक्षेप करण्यासाठी मी आज मुख्यमंत्र्यांना भेटलो, असे राणे यांनी या भेटीनंतर सांगितले. 

राज्य सरकारने आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी हस्तक्षेप करावा. मराठा आरक्षणावर सरकारने विचार करावा आणि त्वरित निर्णय घ्यावा, अशी विनंती मुख्यमंत्र्यांना केल्याचेही राणे म्हणाले. आरक्षण लवकरात लवकर कस देता येईल यावरही चर्चा झाली, असे त्यांनी  सांगितले. 

मराठा आंदोलन हिंसक झाल्याबाबत त्यांना विचारले असता, आंदोलकांनी लोकशाही मार्गाने आंदोलन करावे आणि आपल्याला न्याय मिळवून घ्यावा. कोण चूक आणि कोण बरोबर हे सांगण्याची वेळ नाही. मराठा समाजातील तरुणांनी आत्महत्या करू नका, असे आवाहन त्यांनी केले. कोर्टात जे प्रतिज्ञापत्र द्यायचे आहे त्यात कोणते मुद्दे मांडायचे या संदर्भातही मुख्यमंत्र्यांशी बोललो. येत्या दोन ते तीन दिवसात हालचाली होतील आणि यावर पडदा पडेल, असे राणे म्हणाले.