Tue, Jul 16, 2019 09:47होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सुबोधकुमार जयस्वाल मुंबईचे नवे सीपी

सुबोधकुमार जयस्वाल मुंबईचे नवे सीपी

Published On: Jul 01 2018 2:16AM | Last Updated: Jul 01 2018 2:07AMमुंबई : प्रतिनिधी

केंद्रीय गुप्तचर यंत्रणा ‘रॉ’ मध्ये उच्चपदावर कार्यरत असलेल्या आयपीएस अधिकारी सुबोधकुमार जयस्वाल यांनी शनिवारी सायंकाळी मुंबईच्या पोलीस आयुक्तपदाचा पदभार पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांच्याकडून स्वीकारला. राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथूर सेवानिवृत्त झाल्याने त्यांच्या जागी मुंबईचे पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांची नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे मुंबईचे पोलीस आयुक्तपद रिक्त झाले होते.

केंद्रामध्ये प्रतिनियुक्तीवर असलेल्या जयस्वाल यांना गृहमंत्रालयाने काही महिन्यांपूर्वी पत्र लिहून राज्य पोलीस दलात परतण्यास सांगितले होते. त्यानंतर राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथूर हे 30 जूनला निवृत्त होणार असल्याने जयस्वाल यांना पुन्हा राज्य पोलीस दलात आणण्यासाठी हालचाली राज्य शासनाकडून सुरु झाल्या. अखेर केंद्राकडून हिरवा कंदील मिळताच 29 तारखेला जयस्वाल यांना पुन्हा राज्य पोलीस दलाच्या सेवेमध्ये पाठविण्याचे आदेश काढण्यात आले.

जयस्वाल हे शनिवारी सकाळी मुंबईमध्ये परतल्यानंतर त्यांनी राज्य पोलीस मुख्यालयात जाऊन कागदोपत्री कारवाई पूर्ण केली. त्यानंतर गृहमंत्रालयाने लगेचच मुंबईचे नवीन पोलीस आयुक्त म्हणून जयस्वाल यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला. 

मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये सायंकाळी सव्वासातच्या सुमारास पडसलगीकर यांच्याकडून जयस्वाल यांनी पदभार स्विकारला. यावेळी मुंबई पोलीस दलातील सहआयुक्त कायदा व सुव्यवस्था देवेन भारती, गुन्हे शाखेचे प्रमुख सहआयुक्त आशुतोष डुंबरे, प्रशासन विभागाचे प्रमुख सहाआयुक्त संतोष रस्तोगी, वाहतूक विभागाचे प्रमुख अमितेष कुमार, आर्थिक गुन्हेशाखेचे प्रमुख सहाआयुक्त विनयकुमार चौबे, विशेष शाखेचे प्रमुख अप्पर पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, परिमंडळ एकचे उपायुक्त डॉ. मनोजकुमार शर्मा यांच्यासह वरीष्ठ अधिकारी उपस्थीत होते.

मुंबईचे पोलीस आयुक्तपद हे एक महत्वाचे आणि मानाचे पद आहे. शासनाने या पदावर माझी नियुक्ती करुन एक जबाबदारी सोपविल्याने मी शासनाचा आभारी आहे. माझ्यासाठी ही एक मानाची आणि गौरवाची बाब असून याआधी आयुक्तपदी विराजमान अधिकार्‍यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचा आलेख आणि पोलीस आयुक्त पदाचा दर्जा आणखी पूढे नेण्याचा प्रयत्न करणार आहे.