Wed, Apr 24, 2019 19:32होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईतील २०० रस्त्यांच्या घोटाळ्याचा अहवाल सादर करा

मुंबईतील २०० रस्त्यांच्या घोटाळ्याचा अहवाल सादर करा

Published On: Feb 08 2018 1:48AM | Last Updated: Feb 08 2018 1:33AMमुंबई : प्रतिनिधी 

234 रस्त्यांच्या कामात घोटाळा झाला असताना, केवळ 34 रस्त्यांच्या घोटाळ्यातील अधिकार्‍यांसह कंत्राटदारांवर कारवाई करण्यात आली. उर्वरित 200 रस्त्यांचा अहवाल महापौरांना सादर करणार असल्याची घोषणा करण्यात आली, पण अहवाल कुठे आहे, असा थेट सवाल बुधवारी स्थायी समिती सदस्यांनी प्रशासनाला विचारला. 

मुंबईत अनेक रस्त्यावर खड्डे पडले असताना, कंत्राटदारांसह अधिकार्‍यांना वाचवले जात असल्याचा आरोप भाजपाचे सदस्य अभिजित सामंत यांनी केला. विलेपार्ले येथे बनवण्यात आलेला सिमेंट काँक्रीट रोड उंच सकल असून हा रस्ता बनवणार्‍या कंत्राटदारावर कारवाई करा, अशी मागणीही सामंत यांनी केली. यावर 200 रस्त्यांच्या चौकशीचा अहवाल कधी सादर करणार अशी विचारणा सर्व पक्षीय सदस्यांनी केली. पण या प्रश्नाला उत्तर देणे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय मुखर्जी यांनी टाळले. अखेर 200 रस्त्यांचा अहवाल लवकरात-लवकर सादर करण्याचे आदेश स्थायी समिती सभापती रमेश कोरगावकर यांनी दिले. 

मुंबई महापालिकेच्या रस्ते घोटाळ्यात  तब्बल 100 अभियंत्यांना दोषी ठरवण्यात आले. यामध्ये 1 उप प्रमुख अभियंता, 1 सहायक अभियंता आणि 2 दुय्यम अभियंता अशा 4 अभियंत्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. तर 7 अभियंत्यांना पदावनत करत उर्वरित सर्व अभियंत्यांना वेतनवाढ रोखण्यात आली आहे. तर काहींना रोख रकमेचा दंड अशाप्रकारच्या शिक्षा  करण्यात आली. यापैकी केवळ 4 अभियंते यांना दोषमुक्त ठरवण्यात आले आहे. पण 234 रस्त्यांपैकी 34 रस्त्यांची प्राथमिक तपासणी करून अहवाल बनवला होता. त्यामध्ये 100 अभियंत्यांवर दोषारोप ठेवण्यात आला होता. मात्र, उर्वरित 200 रस्त्यांचीही चौकशी सुरू आहे त्याचे काय झाले. असा सवाल करत, बुधवारी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी स्थायी समितीचे लक्ष वेधले.